अकोले तालुक्यातील मवेशी गावात ‘प्रशासन गाव की ओर’ उपक्रमाचे आयोजन ;जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा मुक्काम मवेशी गावात
शिर्डी, दि.२१ – प्रशासनाने सकारात्मकता दाखविली तर अशक्य गोष्ट शक्य होते. प्रशासनातील सकारात्मक दृष्टिकोनाचा वापर करत नागरिकांच्या घरी जाऊन शासकीय योजनांचा लाभ देण्याचा संकल्प आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
अकोले तालुक्यातील मवेशी गावात सुशासन सप्ताहांतर्गत आयोजित ‘प्रशासन गांव की ओर’ या अभियानात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, संगमनेर उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, राहूल शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, राजूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती देवकन्या बोकडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी अमर माने आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी मवेशी गावातील ग्रामस्थ, महिला, पुरूष व तरूणांच्या समस्या जाणून घेतल्या. ते म्हणाले, मवेशी गावातील समस्यांची नोंद प्रशासनाने घेतली आहे. येथील एकाही नागरिकांने वैयक्तिक समस्या न मांडता सार्वजनिक समस्यांची मांडल्या आहेत, हे निश्चितच उल्लेखनीय आहे. याठिकाणी जॉब कार्ड वितरित करण्यात आलेल्या ग्रामस्थांना येत्या काही दिवसांत गावातच रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. जल जीवन मिशन अंतर्गत पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यात येईल.
नारी भवन उभारणीसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल. सर्प व विंचू दंशांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलक औषधे उपलब्ध करून देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत मवेशी ग्रामस्थांचे प्रश्न सुटलेले असतील, असेही जिल्हाधिकारी श्री.सालीमठ यांनी सांगितले.
येरेकर म्हणाले, संविधानाच्या लोक कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेवर आधारित आणि शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या धर्तीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातून मवेशी गावाची झालेली निवड या भागातील नागरिकांचे राहणीमान उंचाविण्यासाठी सहायक ठरणार आहे. या शिबिरात विविध विभागांच्या स्टॉलवर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया ग्रामस्थांनी पूर्ण करावी. महिन्याभरात अर्जावर लाभ देण्याची कार्यवाही केली जाईल.
अभियानांतर्गत कार्यक्रमस्थळी कृषी, पशुसंवर्धन, महसूल, आरोग्य, आदिवासी विकास, वन विभाग, पंचायत समिती, महिला व बालविकास, समाजकल्याण, दिव्यांग कल्याण, विशेष सहाय्य, संजय गांधी निराधार अनुदान योजना आदी विभागांचे योजनांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलवर योजनांची माहिती देण्यात येऊन लाभार्थी नोंदणी करण्यात आली. आरोग्य विभागाच्या कक्षात महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. याप्रसंगी या शासकीय विभागाच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्र, आयुष्यमान कार्ड, बेबी केअर कीट, जॉब कार्ड, ताडपत्री व धनादेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय विभागांच्या स्टॉलला भेट देत अधिकारी- कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.
या उपक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा मुक्काम मवेशी गावातील आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात असणार आहे. मुक्कामादरम्यान ते गावातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत.