चार महिन्यांतच केंद्रातील सरकार कोसळणार; जयंत पाटलांच्या दाव्यानं खळबळ

0

सातारा : केंद्रातील भाजप सरकार चार महिन्यांतच बदलणार आहे. त्यानंतर दिल्लीतील सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण जातील. मी इंडिया आघाडीचा सदस्य आहे म्हणून सांगतोय, असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
त्यांचा या दाव्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व कोयना बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील व राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, विलासकाका म्हणजे एक धगधगती मशाल होती. मला सहकारात काम करण्याची संधी त्यांनी दिली. आज सगळी माणसे खोक्याची दिसतात. मात्र विलासकाकांसारखी माणसे होणे अवघड आहे. उदयसिंह पाटील यांच्या रुपाने आम्ही विलासकाकांना बघतोय.
त्यांनी जनतेच्या हिताचे काम करावे. प्रतापराव भोसले यांच्यानंतर विलासकाकांनी सातारा बँक चांगली चालवली. सातारा जिल्हा बँकेने विलासकाकांचे सहकारातील योगदान यावर पुस्तक तयार करावे, असेही पाटील यांनी सांगितले.

यानंतर पाटील यांनी केंद्रातील एनडीए सरकारवर भाष्य केले. चार महिन्यांत केंद्रातील सरकार बदलणार आहे. दिल्लीतील सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण हे केंद्रात जातील. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचा अनेक वर्षांचा कार्यकाळ दिल्लीत घालवला. त्यामुळे त्याचा फायदा आम्हाला, महाराष्ट्राला होईल.
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्य सरकारची हमी दिली. ज्या ठिकाणी यशवंतराव मोहिते आम्हाला कार्ल मार्क्स शिकवायचे त्या ठिकाणी भाजप वाढतेय त्याचे वाईट वाटते, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार संग्राम थोपटे, माजी खासदार श्रीनिवास पाटील, जयवंतराव आवळे, संयोजक अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, अथनी शुगरचे अध्यक्ष श्रीमंत पाटील, माजी आमदार रामहरी रूपनवर आदी मान्यवर उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here