जामखेड तालुका प्रतिनिधी
जामखेड शहरालगत असलेल्या चुंबळी येथील गडदे वस्तीवर घरातील माणसं शेतात ज्वारी काढण्यासाठी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील तीन लाख बावीस हजार लंपास केल्याची घटना घडली असून भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेने चुंबळी परीसरात एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत सविस्तर असे की, जामखेड नगरपरिषद हद्दीतील चुंबळी येथील गडदे वस्ती येथील रहिवासी व या घटनेतील
फिर्यादी रामभाऊ सिताराम कारंडे (वय ३२) हे दि. २ मार्च रोजी सकाळी आपल्या पत्नीसह शेतात ज्वारी काढण्यासाठी गेले होते. तर त्यांची दोन मुले शाळेत गेली होती. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप लावलेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा रामभाऊ कारंडे यांचे घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाट उचकटून त्यातील गाई घेण्यासाठी ठेवलेले ३ लाख २२ हजार रूपये रोख रक्कम चोरुन पोबारा झाले
सायंकाळी हे शेतकरी कुटुंब जेंव्हा घरी आले तेंव्हा त्यांना घराचे दार उघडे असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी आत जाऊन पाहिले आसता. घरातील कपाटाचे लॉक तुटलेले दिसले व इतर सामान अस्त व्यस्त पडलेले दिसले. फीर्यादीने कपाटात पाहीले आसता गाई घेण्यासाठी कपाटात ठेवलेले ३ लाख २२ हजार चोरट्यांनी चोरुन नेल्याचे लक्षात आले.
या प्रकरणी फीर्यादी रामभाऊ कारंडे रा. चुंबळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत.
यापुर्वीही जामखेड तालुक्यात भरदिवसा घरफोड्या होण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. सध्या शेतात ज्वारी काढण्याचे काम सुरू आसल्याने ग्रामीण भागात दिवसभर घरी व वाड्या वस्त्यांवर कोणी नसते. याच संधीचा फायदा चोरटे घेत आहेत. त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे…