जलसिंचनाचे योग्य नियोजन केल्यास परिसर समृद्ध होतो – सुवर्णा माने  

0

कोपरगाव ( वार्ताहर ) दि. ७ आॅक्टोंबर २०२२

ज्या परिसरात जलसिंचनाचे योग्य नियोजन केलेले असेल  तो परिसर खऱ्या अर्थाने समृद्ध झालेला असतो. याचे वास्तववादी दर्शन संवसर परिसरात घडते. संवत्सरला  राबविण्यात आलेले उपक्रम केवळ जिल्ह्यालाच नव्हे तर राज्याला देखील मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन जिल्हा उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने यांनी केले.

संवत्सर येथील वन विभागाच्या क्षेत्रात माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे पाटील यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या साठवण बंधाऱ्यातील पाण्याचे पूजन तसेच प.  पू. महंत राजधरबाबा प्राणवायू स्मृतीवनातील  परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख महंत रमेशगिरीजी महाराज,  जिल्हा उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने,  गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते नुकतेच झाले. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्रीमती माने बोलत होत्या. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे पाटील, पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी पंडितराव वाघिरे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री गुंजाळ, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे, गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख, सेवानिवृत्त उप अभियंता उत्तमराव पवार, सरपंच सौ.  सुलोचना ढेपले, उपसरपंच विवेक परजणे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी ग्रामस्थांच्यावतीने प. पू. महंत रमेशगिरीजी  महाराज व श्रीमती सुवर्णा माने यांचा सत्कार करण्यात आला.

अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी वनविभागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून अशा क्षेत्रात छोटे – मोठे साठवण बंधारे, औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करून परिसराची समृद्धी वाढविता येते. यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न व इच्छाशक्तीची आवश्यकता लागते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांनी संवत्सर परिसरात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना व उपक्रम राबवून जिल्ह्यात गावाचा नावलौकिक वाढवला आहे. मूलभूत गरजा ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच शिक्षण क्षेत्राची देखील या परिसरात चांगली प्रगती दिसून येते असे गौरवोद्गार श्रीमती माने यांनी काढले.

महंत रमेशगिरीजी महाराज यांनी दिवंगत नेते नामदेवराव परजणे  आण्णा यांच्या स्मृतींना उजाळा देताना ग्रामीण परिसरातील मुलींना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे हे अण्णांचे स्वप्न होते ते त्यांची कन्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील व पुत्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांनी पूर्ण करून वडिलांप्रती कृतज्ञता साकार करून दाखविली आहे. परिसरात बंधारे बांधून सिंचनाचे योग्य नियोजन केल्याने भर उन्हाळ्यातही संवत्सरला  पाणीटंचाई जाणवत नाही ही कौतुकास्पद बाब असल्याचेही पूज्य रमेशगिरीजी महाराज म्हणाले.

जि. प. राजेश परजणे पाटील, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख  यांचीही यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमास ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे, चंद्रकांत लोखंडे, भरत बोरनारे,  खंडू फेपाळे,  लक्ष्मणराव परजणे,  दिलीपराव ढेपले,  सतीश शेटे, सोमनाथ निरगुडे, बापू तिरमखे, अरविंदराव जगताप, शिवाजीराव गायकवाड, रमेश निरगुडे, राजेंद्र खर्डे,  बाळासाहेब दहे, नारायण निरगुडे, लक्ष्मणराव बोरनारे,  बापूसाहेब गायकवाड,  अनिल आचारी,  अविनाश गायकवाड त्यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्ष्मणराव साबळे यांनी सूत्रसंचालन केले तर श्रीमती शबाना शेख यांनी आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here