जहांगिरमध्ये ‘ द स्पेक्ट्रम ऑफ कलर्स २०२३’ हे चित्र – शिल्प समूह कला प्रदर्शन

0

उरण दि २९(विठ्ठल ममताबादे )जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई येथे ‘द स्पेक्ट्रम ऑफ कलर्स’ या समूह प्रदर्शनाचे आयोजन दि २ ते ८ मे २०२३ दरम्यान करण्यात आले आहे.  या प्रदर्शनामध्ये सुप्रसिध्द कलाकार लक्ष्मीनारायण शर्मा, ममता शर्मा, रुपेश पाटील, कुमार गायकवाड, राजू औताडे, कल्पना आर्य, चेतन वैती, वैभव गायकवाड, मकरंद जोशी, श्रेयस खानविलकर या कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. 

‘द स्पेक्ट्रम ऑफ कलर्स’ हे प्रदर्शन रसिकांना सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पाहता येतील. लक्ष्मीनारायण शर्मा हे वास्तववादी शैलीत चित्र साकारतात. निसर्गचित्र आणि व्यक्तिचित्र रंगवण्यात त्यांना विशेष प्राविण्य मिळाले आहे.  ममता शर्मा या जेजे स्कूल ऑफ आर्टच्या माजी विद्यार्थिनी असून त्यांच्या चित्रातून मानवी आकृत्यांचे अलंकारात्मक मोहक चित्रण रसिकांना पाहता येते. तेजस्वी आणि आकर्षक रंगांचा वापर हे त्यांच्या चित्रांचं वैशिष्टय आहे.  रुपेश पाटील हे वास्तवादी शैलीत काम करतात आणि पेस्टल व जलरंगांवर त्यांचं विशेष प्रभुत्व आहे. रुपेश यांना त्यांच्या चित्रकलेतील योगदानाबद्दल प्रफुल्ला डहाणूकर अवॉर्ड मिळाले आहे.  कुमार गायकवाड हे भारतीय संस्कृतीला आपल्या विशिष्ट शैलीच्या माध्यमातून कॅनव्हासवर चितारतात. आकर्षक रंगांचा वापर आणि शैलीदार फॉर्म्स हे कुमार यांच्या चित्रांचं वैशिष्ट्य आहे.  राजू औताडे हे प्रामुख्याने ॲक्रिलिक माध्यमात काम करतात. विविध आकारांना लयबद्ध रीतीने कॅनव्हासवर गुंफण करून ते आशयघन कलाकृती तयार करतात. बिंदूंचा शिस्तबद्ध आणि संयमित वापर हे औताडे यांच्या चित्रांचं वैशिष्टय आहे. कल्पना आर्य यांना जुन्या शहरातील गल्ल्या आणि रस्ते नेहमीच प्रेरणा देत आले आहेत. कल्पना व रंगसंगती यांची उत्कृष्ठ सांगड  घालून त्यातून आकर्षक असे सिटीस्केप्स तयार झाले आहेत. कल्पना यांच्या सिटीस्केप्स रसिकांना शहरांच्या सौन्दर्याशी नव्याने परिचय करून देतात. 

चेतन वैती हे कलात्मक पद्धतीने शिल्प तयार करतात. त्यांची शिल्पे म्हणजे पारंपरिक विषयांना दिलेला अद्भुत आकार होय. त्यांच्या शिल्पाकृती मध्ये प्रामुख्याने घोडा हा विषय असून, त्याची विविध रूपे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांची शिल्पे ही रसिकांना आकर्षून घेतातच सोबत अद्भुतरसाचे दर्शनही करवतात. 

वैभव गायकवाड हे आपल्या कलाकृतीमध्ये वैविध्यपूर्ण माध्यमांचा वापर करतात. तंत्रावर त्यांचं प्रभुत्व असल्यामुळे त्यांच्या कलाकृतीमधले  वेगवेगळे प्रयोग नेहमीच रसिकांना आकर्षून घेतात. 

मकरंद जोशी यांची जलरंगांमधील निसर्गचित्रे प्रमाणबद्ध आणि  वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पर्स्पेक्टिव्हचे योग्य भान आणि रंगांचा तंत्रशुद्ध पद्धतीने वापर यामुळे त्यांची चित्रे ओल्ड मास्टर्सच्या शैलीची आठवण करून देतात. 

श्रेयस खानविलकर हे  वास्तुविशारद असून शिल्पकारही आहेत.  त्यांच्या कलाकृती या भविष्याचा वेध घेणाऱ्या ठरतात. खानविलकर एकाच वेळी पारंपारिक , आधुनिक शिल्पकला अशा दोन्ही माध्यमात कलाकृती तयार करून रसिकांना थक्क करून सोडतात. कायनेटिक शिल्प हे नवमाध्यम श्रेयस खानविलकरांच्या विशेष पसंतीचे आहे. त्यामध्ये काम करत खानविलकर रसिकांना एक प्रकारे भविष्याच दर्शनच करवतात  हे प्रदर्शन रसिकांना सकाळी ११:०० ते संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत विनामूल्य पाहता येईल.  ‘द स्पेक्ट्रम ऑफ कलर्स’ हया प्रदर्शनाच्या माध्यमातून कलेमधील वेगेवेगळ्या शक्यता आणि कलेची विविधांगी रूपे याचे दर्शन रसिकांना होईल. त्यामुळेच चुकवू नये असेच हे प्रदर्शन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here