आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपात प्रवेश.
जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील राजुरी, डोळेवाडी,एकबुर्जीवस्ती , घुलेवस्ती, बांगरवस्ती आणि खर्डा परीसरातीलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोनशे कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला
रविवारी ( ता.२०) चोंडी येथे आमदार प्रा राम शिंदे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात जाहिर प्रवेश केला. जामखेड तालुक्यात अचानक राजकीय भूकंप झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या राजकीय भुकंपामुळे राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. जामखेड तालुक्यात आलेल्या राजकीय भूकंपाचे केंद्रबिंदू राजुरी हे गाव ठरले. राजुरीला राष्ट्रवादीचा मजबुुत बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. मात्र या बालेकिल्ल्याला मोठे भगदाड पडले आहे. राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय भूकंप झाला. राजुरी गावातील बडे राजकीय प्रस्थ माजी सरपंच सुभाष काळदाते यांनी आपल्या २०० समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश करत जामखेड तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. हे सर्व जण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते.
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रा. राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिंदे यांनी माजी सरपंच सुभाष काळदाते यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे भाजपात स्वागत केले व राजुरीचे कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. ग्रामपंचायत निवडणुकीत आपला पॅनल बहुमताने निवडून आणा, तुमच्या पाठीशी सर्व ताकद लावू, गावाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे, असा शब्द यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी दिला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष आजीनाथ हजारे , भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, पांडुरंग उबाळे, प्रविण चोरडिया, डाॅ अल्ताफ शेख, प्रसिद्धी प्रमुख आप्पासाहेब ढगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
राजुरी ,डोळेवाडी,एकबुर्जी,घुलेवस्ती,बांगरवस्ती आणि खर्डा परीसरातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला आहे.या सर्वांचे मी स्वागत केले आहे. या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देतानाच त्याभागातील प्रश्र प्राधान्याने सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे.’
आ. राम शिंदे