पंचायत समितीचे माजी सभापती भगवान मुरूमकर यांच्यावर ५० लाखाची खंडणी मागितली प्रकरणी गुन्हा दाखल, परस्पर विरोधी फिर्यादी दाखल
जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती व भाजपाचे नेते डॉ. भगवान मुरूमकर व त्यांच्या इतर पाच साथीदारासह दोन अनोळखी व्यक्तीवर ५० लाखाची खंडणी मागितली प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तसेच भगवान मुरूमकर यांच्या एका साथीदाराने चारचाकी दुकानांसमोर लावली म्हणून चार जणांनी लोखंडी हत्याराने मारहाण करून गळ्यातील सात तोळे सोन्याची चैन गहाळ झाल्याची फिर्याद दाखल केली आहे. परस्परविरोधी फिर्यादी वरून या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सागर उमाकांत अंदुरे यांनी फिर्याद दिली की, वडील उमाकांत अंदुरे यांना दि. १६ आँगस्ट रोजी अहमदनगर येथे असताना भगवान मुरूमकर यांचा फोन आला नगरवरून आल्यावर फोन करा पण वडीलांनी फोन केला नाही म्हणून २४ आँगस्ट रोजी भगवान मुरूमकर दुकानात आले यावेळी वडील उमाकांत चुलते शशिकांत व फिर्यादी बसले होते यावेळी मुरूमकर यांनी तुमचे पाच दुकाने आहेत ते खूप जोरात चालतात व तुम्ही खूप पैसे कमावणार आहे तरी मला तुम्ही एका दुकानाचे दहा लाख याप्रमाणे पाच दुकानाचे ५० लाख रुपये दिवाळीच्या आधी पर्यंत पैसे दिले नाहीत तुमच्या परिवारातील सर्व माणसांना खल्लास करील व दुकानाची तोडफोड करेल माझ्याकडे अनेक प्रकारचे गुंड आहेत. ५० लाखापैकी दहा लाख येत्या दोन दिवसांत पाहिजे असे म्हणून निघून गेले. तसेच त्यांनी व त्यांच्या इतर साथीदारांनी वेळोवेळी भेटून पैशाची मागणी केली परंतु वडीलांनी पैसे देण्यास नकार दिला.
२३ आँक्टोबर रोजी वडील उमाकांत अंदुरे हे जुन्या बसस्थानक समोरील आमच्या दुकानासमोरील चहाच्या टपरीवर गेले असता तेथे भरत जगदाळे याने वडीलांना बोलावून तुम्हाला दिलेली मुदत संपली पैसे देऊन टाका वडीलांनी पैसे देण्यास नकार देताच मारहाण करण्यास सुरुवात केली. जगदाळे याच्याबरोबर असलेले सागर डिसले, अमोल आजबे यांनी वडीलांना मारहाण करू लागले व म्हणाले सभापतीने सांगून पण तुम्ही पैसे देत नाही आता खल्लास करतो असे म्हणून वडीलांच्या डोक्यात दगड घातला व फरशी छातीवर मारली हे पाहून चुलते शशिकांत भांडणे सोडवण्यासाठी गेले असता त्यांना तिघांनी डोक्यात वीट मारून जखमी केले व फिर्यादी सागर अंदुरे तेथे आले असता त्यांना मारहाण केली भगवान मुरूमकर यांनी मागितलेली रक्कम दिली नाही म्हणून खल्लास करतो अशी धमकी दिली व पोलीसांत तक्रार दिली तर दुकान फोडून टाकण्याची धमकी दिली व निघून गेले. त्यामुळे भगवान मुरूमकर, भरत जगदाळे, विक्रम डाडर, सोनु वाघमारे, सागर डिसले, अमोल आजबे व अनोळखी दोन यांच्या वर भादवी कलम ३८७, ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दुसरी फिर्याद
भरत पांडूरंग जगदाळे (वय ३४ वर्ष रा. जगदाळे वस्ती, जामखेड) यांनी फिर्याद दिली की, आरोपी उमाकांत अंदूरे, सागर उमाकांत अंदूरे, शशिकांत अंदूरे, आदित्य शशिकांत अंदूरे व इतर अनोळखी तीनजण (सर्व रा.जामखेड) यांनी संगणमत करुन फिर्यादीस म्हणाले, तुला मागील वेळेस सांगितले होते की, आमचे दुकानासमोर गाडी लावू नको तुला एकदा सांगितलेले ऐकू येत नाही काय. तु खुप माजलास का असे म्हणून आरोपी उमाकांत अंदुरे याने त्याचे हातातील लोखंडी गजाने फिर्यादीचे पायावर व छातीवर मारहाण करुन फिर्यादीचे गळ्यातील सात तोळे वजनाची सोन्याची चैन काढुन घेवुन जीवे मारण्याची धमकी दिली व साक्षीदार हे भांडण सोडविण्यास आले असता त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच म्हणाले की, आमच्या नादी लागू नका आमचेकडे पाच दुकाने असून आमचेकडे पैसेही भरपूर आहे. अशी धमकी दिली वगैरे मजकुरच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.