वन विभागाकडून पंचनामा.. परिसरात पिंजरा लावा.. माजी सरपंच सतीश केकाण यांची मागणी
कोपरगाव (प्रतिनिधी) : कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा परिसरात बिबट्याचा गेल्या सहा महिन्यापासून मुक्त संचार असून या बिबट्याच्या धास्तीने नागरिक पुरते भयभीत झाले आहे. काल रात्री सोपान विश्वनाथ केकान यांच्या गोठ्यावर या बिबट्याने हल्ला करत दोन कालवडींची शिकार त्याने केली. आज हा बिबट्या पाळीव प्राण्यांची शिकार करत असून उद्या माणसावरही हल्ला होईल अशी परिस्थिती सध्या या परिसरात ओढावली आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने या परिसरात बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावा अशी मागणी माजी सरपंच सतीश केकाण यांनी केली आहे .
घटनास्थळी येऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिकार झालेल्या कालवडींचा पंचनामा केला. मात्र गेल्या काही महिन्यापूर्वी सोपान केकाण यांच्याच शेळ्यांची शिकार झाली होती. तेव्हाही वन विभागाकडून पंचनामा झाला होता मात्र कुठल्याही प्रकारची मदत त्यांना मिळाली नसल्याचे केकान यांनी सांगितले.
केकान यांच्या वस्तीवर हल्ला झाल्यानंतर बिबट्याने तिथून धुम ठोकली. घडलेला प्रकार सोपान केकाण यांनी माजी सरपंच सतीश केकाण यांना फोन करून सांगितला. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळी जात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळवले. सकाळी उशिरा वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा त्यांनी मृत झालेल्या कालवडींचा पंचनामा केला. यावेळी माजी सभापती मच्छिंद्र केकाण, सतीश केकाण,सरपंच मनिषा केकाण, पोलीस पाटील हरिभाऊ केकान, ग्राम विकास अधिकारी श्री थोरात, सोपान केकाण अदी उपस्थित होते.
या परिसरात सध्या शेतीची लगबग सुरू असल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी बिबट्याच्या दहशतीने जीव मुठीत धरून जावा लागतो. प्राण्यांची शिकार होती मात्र वन विभागाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. किमान बिबट्या जेर बंद करण्यासाठी वनविभागाने या परिसरात आता तरी पिंजरा लावावा अशी मागणी केकाण यांनी केली आहे.