ज्ञान वृध्दिंगत करण्यासाठी वाचनाचे पारायण करा : डॉ.लक्ष्मण भरगंडे

0

   

जत दि.20(प्रतिनिधी) : जिवनाला पूरक असणारे वाचन आणि लेखन आता बंद चालले आहे. केवळ परीक्षेसाठी वाचन न करता ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी वाचनाचे पारायण करा, वाचन केला तरच स्पर्धेच्या युगात टिकाल. आज प्रत्येक विद्यार्थी मोबाईलच्या आहारी गेल्याचे दिसत असून मोबाईल पासून दूर जाण्यासाठी आपल्याजवळ नेहमी पुस्तक ठेवा असे प्रतिपादन डॉ.लक्ष्मण भरगंडे यांनी केले.

               ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे ग्रंथालय विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या अभियानाच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील हे होते. यावेळी प्रा. बाबासाहेब बेंडेपाटील प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी ग्रंथालय समिती व मराठी विभाग प्रमुख प्रा.कुमार इंगळे यांनी आपल्या प्रस्ताविकात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियानांतर्गत गेल्या पंधरा दिवसात घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. 

            यावेळी अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्राचार्य डॉ.सुरेश पाटील पाटील म्हणाले की, वाचन संकल्प महाराष्ट्राचा हे अभियान वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी सुरू केले असून वाचनामुळेच व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन हे अतिशय महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी प्रेरणा व ऊर्जा उत्पन्न होण्यासाठी महापुरुषांची व लेखकांची चरित्रे आत्मचरित्रे वाचली पाहिजेत असेही ते शेवटी म्हणाले.

           

 वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियानांतर्गत गेल्या पंधरा दिवसात विविध वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने मुक्त वाचन, वर्तमानपत्रातील लेख वाचन व विद्यार्थी परिसंवाद, स्थानिक लेखक परिसंवाद, नवलेखकाची ओळख, प्रकट मुलाखत, दुर्मिळ ग्रंथ प्रकाशन, ग्रंथालयास भेट, मुक्त वाचन, अभिवाचन, वक्त्यांची व्याख्याने, असे वेगवेगळे उपक्रम वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियानांतर्गत महाविद्यालयात घेण्यात आले. या अभियानाचे समन्वयक म्हणून ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा.कुमार इंगळे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.तुकाराम सन्नके यांनी इतर शेवटी आभार प्रा.लक्ष्मण मासाळ यांनी मानले. वाचन संकल्प महाराष्ट्राचा हे अभियान यशस्वी होण्यासाठी राजे विजयसिंह डफळे ग्रंथालय समिती व एक तास ग्रंथालयात या समितीचे समन्वयक व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here