मुंबई : सलग दुसऱ्या वर्षी डाळींची स्थिती बिकट झाली आहे. पेरणीचा पारंपरिक हंगाम (१५ जून ते १५ जुलै) संपल्यानंतर; त्यातही जुलैअखेरपर्यंत पेरण्या होऊनही सध्या देशभरात सर्व प्रकारच्या डाळींच्या पेरण्यांमध्ये ९ टक्क्यांची तूट आहे. यामुळेच प्रामुख्याने तूरडाळीची ५ लाख टनांची तूट असताना त्यात ४ लाख टनांची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही स्थिती समोर आली आहे
भारतात दरवर्षी सर्व प्रकारच्या डाळींचे उत्पादन १२० ते १२२ लाख टनांच्या आसपास असते. त्या तुलनेत मागणी १२६ ते १२८ लाख टन असते. उडीद व मूग वगळता उर्वरित डाळींसाठीचे पीक हे फक्त खरिपात घेतले जाते व या डाळी दिवाळीनंतर (नोव्हेंबरदरम्यान) बाजारात येतात. डाळींच्या एकूण मागणीत सर्वाधिक ४२ ते ४४ लाख टन तूरडाळीचा समावेश असतो. या तुलनेत उत्पादनदेखील जवळपास तितकेच असते. त्यामुळे हंगामाच्या अखेरीस अनेकदा तूरडाळ आयात केली जाते.
मागीलवर्षी नोव्हेंबरमध्ये मात्र देशात ३६.६६ लाख टन तूरडाळीचे उत्पादन बाजारात आले. या स्थितीत जवळपास पाच लाख टनांची घट असताना यंदा पुन्हा उत्पादनात घट होण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागातील राष्ट्रीय खाद्य मिशनच्या माहितीनुसार, ५ ऑगस्टपर्यंत देशात १०६.८८ लाख हेक्टरवर डाळींच्या बियाण्यांची पेरणी झाली आहे. हा आकडा मागीलवर्षी ११७.८७ लाख हेक्टर इतका होता. यानुसार पेरणीत ९.३२ टक्क्यांची घट आहे. तुरीचा विचार केल्यास, यावर्षी आत्तापर्यंत ३७.३८ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. हा आकडा मागीलवर्षी ४०.५८ लाख हेक्टर असून, यंदा त्यात ७.८८ टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळेच यंदा तूट आणखी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मात्र पेरणी क्षेत्रातील चांगल्या पावसाने ४४ हजार हेक्टरवर डाळींच्या अतिरिक्त पेरण्या झाल्या, हे विशेष.
देशातील सरासरी हेक्टरी तूरडाळ उत्पादन हे ८८० किलो आहे. त्यातही २० ते २५ टक्के तूर ही डाळ तयार करण्याच्या प्रक्रियेत वाया जाते. सर्वोत्तम डाळ (फटका) ही ३० टक्केच तयार होते. त्यानुसार आत्तापर्यंत झालेल्या ३७.३८ लाख हेक्टरनुसार अधिकाधिक ३२ लाख टन तूरडाळीचे उत्पादनच शक्य आहे. यानुसार यंदाच्या मोसमातील (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) तूरडाळीच्या तुटीत चार लाख टनांची भर पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
मान्सून विलंबाने पेरण्यांचा हंगाम लांबला. एरवी १५ जुलैला संपणाऱ्या खरिपाच्या व विशेषत: डाळींच्या पेरण्या काही भागांत जुलैअखेरपर्यंत सुरू होत्या. आणखी आठवडाभर त्या होऊ शकतात. विलंबाच्या पेरण्यांचा उडीद व मुगावर परिणाम होऊन बाजारात डाळी विलंबाने आणि कमी प्रमाणात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तूर हे एकल पीक असल्याने तुरीच्या पेरणीक्षेत्रात आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. – डॉ. पी.के. सिंह, केंद्रीय कृषी आयुक्त
Home महाराष्ट्र डाळींच्या उत्पादनात येणार तूट, तुटीमुळे टंचाई निर्माण होण्याची शक्यता, आकडेवारी समोर