येवला (प्रतिनिधी)
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे Dr. Babasaheb Ambedkar कार्य-कर्तृत्व हे जगाला आकर्षित करणार आहे.”शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही”,”मला अजन्म विद्यार्थी राहणे आवडेल”,विद्यार्थ्यांनी आपली लायकी विद्यार्थी दशेतच सिद्ध करावी”,वाचाल तर वाचाल”,”जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला ह्या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे” हे बाबासाहेबांचे युवकांना दिलेले संदेश व आपल्या विद्वत्तेचे देशाला दिलेले दान देशावर केलेले महान ऋण आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक विचारांचे वारसदार बनण्यासाठी व उच्च अधिकार पदाच्या जागा मिळविण्यासाठी वीस-बावीस तास अभ्यासाला बसण्याची क्षमता आपल्यात विकसित करा तरच आपण स्पर्धा परीक्षा मधून अपेक्षित यश मिळू शकतो असे उद्धार येथे मुक्ती महोत्सवा निमित्ताने आयोजित करिअर संधी व तयारी ह्या विषयावर बोलताना दी स्टडी सर्कल फाउंडेशनचे संचालक प्रा.शैलेंद्र पंढोरे यांनी काढले.
धर्मांतर घोषणेच्या ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त मुक्ती महोत्सव समिती भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्ती भूमी अभ्यासिका यांच्यावतीने विविध विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात येत आहेत त्यातील दुसरे पुष्प पंढोरे यांनी गुंफले बाबासाहेबांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकिय विचारच देशाची लोकशाही वाचवू शकतील त्या करता सुशिक्षित युवा वर्गाने जात धर्माची बंधने झुगारून बाबासाहेबांचा राष्ट्रवाद अभ्यासावा असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वस्तीगृहाचे गृहपाल लोखंडे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश खळे,प्रशांत पंढोरे हे उपस्थित होते.
प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्ती महोत्सवाचे मुख्य प्रवर्तक एस.डी.शेजवळ यांनी केली. या प्रसंगी हरीश बनसोडे यांनी स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने मैदानी शारीरिक चाचण्या व त्याची तयारी कशी करावी या संदर्भात विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले.
कार्यक्रमास वस्तीगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ऍड. चंद्रकांत निकम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीत ते साठी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता.