15 दिवसाच्या आता आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे सिडको प्रशासनाकडून आश्वासन.
उरण दि 21(विठ्ठल ममताबादे) : दिनांक 17/12/2020 रोजी दिघोडे ता. उरण, जि. रायगड येथे हेटवणे ते नवी मुंबई या मार्गावरील सिडको प्रशासनाची जलवाहिनी फुटल्यामुळे त्यामधुन वेगाने येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात दिघोडे गावातील पाईप लाईनच्या लगत असलेल्या अनेक घरांमध्ये पाणी घुसून नागरिकांच्या घरांचे व त्यामधील साहित्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.त्याबाबतचे पंचनामे तलाठी वेश्वी, ग्रामसेवक दिघोडे, सरपंच दिघोडे यांनी केले होते. सदर दिघोडे गावातील नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन सिडको प्रशासनाकडून ग्रामस्थांना देण्यात आले होते.मात्र दिड वर्षे उलटूनही नुकसानग्रस्तांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही.याबाबत सिडको प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही आज दीड वर्षाहून अधिक काळ होऊन सुद्धा सिडको प्रशासन नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत होती.नुकसानग्रस्त व्यक्तींची कोणीच दखल घेत नसल्याने दिघोडे येथील एकूण 18 नुकसानग्रस्त ग्रामस्थांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागणीसाठी उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनिष अनंत पाटील यांनी उरण तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते.दिनांक 19/09/2022 रोजी आंदोलनाचा पहिला दिवस होता. दिनांक 20/9/2022 रोजी आंदोलनाचा दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 20/9/2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता डॉ मनिष पाटील यांच्या सोबत बसलेल्या दिघोडे ग्रामस्थांचे मागण्या मान्य करण्यात आले असून नुकसान ग्रस्त व्यक्तींना 15 दिवसाच्या आत आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे सिडको प्रशासनाने कबूल केले आहे. त्यामुळे डॉ मनिष पाटील व त्यांच्या सोबत उपोषणाला बसलेल्या नुकसान ग्रस्त ग्रामस्थ यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. या कामी कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.कामगार नेते महेंद्र घरत यांच्यामुळेच सर्व सूत्रे पटापट हलली व आम्हाला लवकर न्याय मिळाला अशी भावना डॉ मनिष पाटील व उपोषण कर्त्यांनी व्यक्त केली. महेंद्र घरत यांचे यावेळी आभारही मानण्यात आले.
रायगड जिल्हा जेष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, उपाध्यक्ष किरीट पाटील,रायगड जिल्हा काँग्रेस सरचिटणीस रामनाथ पंडित,शहराध्यक्ष प्रकाश पाटील, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, महिला तालुकाध्यक्ष रेखा घरत, महिला तालुका उपाध्यक्ष निर्मला पाटील,मच्छीमार नेते मार्तंड नाखवा,माजी नगरसेवक बबन कांबळे, विभाग प्रमुख विनोद पाटील, श्रेयश घरत, विवेक म्हात्रे, कीर्ती ठाकूर, रंजित ठाकूर, अफशा मुकरी, सदानंद पाटील,मंगेश म्हात्रे आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपोषण स्थळी उपस्थित होते. या उपोषणाला काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दिला असल्याने ही समस्या त्वरित मार्गी लागली त्यामुळे यावेळी डॉ मनिष पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.