मुंबई, संदिप कसालकर : राज्यातील सत्तासंघर्षावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच सुनावणी सुरू आहे. या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं आणि देशाचंही लक्ष लागलं आहे. एकीकडे शिंदे गटात असलेल्या आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय न्यायालयाकडू अपेक्षित असताना दुसरीकडे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमकं कुणाचं? या वादावरही निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. त्यात आजपासून सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज लाईव्ह प्रक्षेपण सुरू झाल्यामुळे सर्वांनाच ही सुनावणी थेट पाहाता येत आहे. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जर शिंदे गटातील आमदार अपात्र ठरले, तर पुढे काय घडणार? याचीही चर्चा जोर धरू लागली आहे.
सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडत आहेत. निवडणूक चिन्हाच्या आधी आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय व्हावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. मात्र, एकनाथ शिंदे गटाकडून आधी निवडणूक चिन्हावर निर्णय व्हावा, अशी मागणी अंतरिम अर्जाद्वारे करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालय नेमका काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुनावणीच्या अनुषंगाने सोमवारी संध्याकाळी केलेल्या एका ट्विटवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील आमदार अपात्र ठरले, तर राज्यात काय घडणार? याची चर्चा सुरू झालेली असताना असं झालं तर पुढच्या १० दिवसांत राज्यातलं सरकार कोसळेल, असं भाकित आमदार अमोल मिटकरींनी केलं आहे. मिटकरींनी ट्वीटमध्ये न्यायालयात सध्या सुरू असलेल्या सुनावणीचा संदर्भ दिली आहे. काल केलेल्या या ट्वीटमध्ये मिटकरी म्हणतात, “उद्या १६ आमदार अपात्र ठरल्यास हे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल..न्यायदेवता न्याय देईलच.”