जामखेड/ अहमदनगर : जर सरकारला कंत्राटदार एवढेच आवडत असतील तर शासनच खाजगी कंपनीच्या हातात देऊन टाका अशा शेलक्या शब्दात आमदार रोहित पवार यांनी राज्यातील सध्या सुरु असलेल्या भरती प्रक्रियेवरून राज्य सरकारवर टीका केली आहे.
सध्या राज्यात विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र हि भरती प्रक्रिया संपूर्णपणे खाजगी कंपन्यांच्या मार्फत राबविली जात आहे. यासाठी बेरोजगार उमेदवारांकडून तब्बल १००० रुपये परीक्षा शुल्क आकारले जात आहे. शासनाच्या या निर्णयावर सर्व स्तरातून टीका होत आहे. मात्र राज्य शासनाकडून या निर्णयाचं समर्थन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते की राज्य शासनाच्या मार्फत कायम स्वरुपी भरती जर केली तर त्याचा खर्च जास्त असतो. तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही या निर्णयाचं समर्थन केलं होत त्यावर आ. रोहित पवार यांनी या निर्णयावर टीका करताना म्हटले आहे की कंत्राटी भरतीबाबत शासन विचार करत असेल तर कंत्राटी भरतीच्या कंपन्या कुणाच्या आहेत याचाही विचार करायला हवा, आणि जर सरकारला कंत्राटदार एवढेच आवडत असतील तर शासनच खाजगी कंपन्यांच्या हातात देऊन टाका असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायमस्वरुपी शासकीय कर्मचाऱ्याच्या वेतनात कंत्राटदाराच्या माध्यमातून भरती केल्यास तिघांना नोकरी मिळेल असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून रोहित पवार यांच्या टीकेकडे पहिले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका करताना पुढे म्हटले आहे की म्हटले की, एका बाजूला सरकार नको तेवढा खर्च करतंय. मग ते माजी खासदारांच्या सुरक्षेसाठी असो की इतर कारणांसाठी असो…सरकार करोडो रूपयांचा खर्च करत आहे. तर, दुसरीकडे सामान्य मुलांकडून हजार हजार रुपयाची वसुली स्पर्धा परीक्षेसाठी करत आहे. त्यामुळे सामान्य मुलांकडून हा खर्च वसूल केला जातोय तो बंद करायला हवा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.