कर्जत : “तुम्ही केलं ते बरोबर आणि आम्ही केलं तर चूक कसं काय?” असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना केला आहे . कर्जत येथील पक्षाच्या शिबिरामध्ये छगन भुजबळ यांनी आज मनोज जरांगे यांच्या ऐवजी शरद पवार यांच्यावर टीका केली.
भुजबळ पुढे म्हणाले की अनेकदा भाजपला युतीचा प्रस्ताव दिला. चर्चा झाल्या. एकदा नाही अनेकदा झालं. आम्ही काय वेगळं केलं? आम्ही आमचा पक्ष सोडला नाही. आम्ही विचारधारा बदलली नाही. आम्ही मार्ग बदलला नाही. जयललिता, नवीन पटनायक, मेहबुबा मुफ्तीही भाजपसोबत गेल्या होत्या. भाजपसोबत गेले म्हणून त्यांची विचारधारा बदलली का? ते त्यांच्या विचारधारेने काम करत आहेत. आम्ही भाजपच्या सरकारमध्ये गेलो. त्याआगोदर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सरकारमध्ये गेलो. म्हणजे आम्ही शिवसेनेचे झालो का? नाही. आम्ही आमची विचारधारा बदलली का? नाही. तिकडे बसलो तर चालतं. इकडे बसलं तर नाही चालत का? तुम्ही केलं ते बरोबर. आम्ही केलं ते चूक, हे कसं काय? असा सवाल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना केला.
तुम्ही 5-6 वेळा भाजपसोबत जाऊ असं म्हणाला होता. एखाद्या पक्षाला आधी हो म्हणून नंतर नकार देणं हे एकदा ठिक आहे. वारंवार कशाला? वारंवार भूमिका बदलणं चुकीचं आहे. 2004पासून काही तरी सुरूच होतं ना. काही गोष्टी प्रफुल्ल पटेल यांना माहीत आहेत. काही गोष्टी अजितदादांना माहीत आहेत. मला थोड्या गोष्टी माहीत आहेत, असा चिमटा भुजबळ यांनी काढला.काढला.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यात जनतेने दाखवून दिलं. भाजप मोठा पक्ष आहे. त्यानंतर दोन नंबरचा पक्ष राष्ट्रवादी ठरला आहे. ही समान्य लोकांची ही पावती आहे. खासदारकी नाही, आमदारकी नाही, जिल्हापरिषदेचीही नाही, ही ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. सामान्यांची निवडणूक आहे. जनतेनेही आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे. तुम्ही जे काही केलं आहे, ते बरोबर आहे. महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे. यावर जनतेने शिक्कामोर्तब केलं आहे, असंही ते म्हणाले.