दिघोडे ग्रामस्थांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी डॉ.मनिष पाटील यांचे उरण तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण.

0

उरण दि 19(विठ्ठल ममताबादे) : दिनांक 17/12/2020 रोजी दिघोडे ता. उरण, जि. रायगड येथे हेटवणे ते नवी मुंबई या मार्गावरील सिडको प्रशासनाची जलवाहिनी फुटल्यामुळे त्यामधुन वेगाने येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात दिघोडे गावातील पाईप लाईनच्या लगत असलेल्या अनेक घरांमध्ये पाणी घुसून नागरिकांच्या घरांचे व त्यामधील साहित्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.त्याबाबतचे पंचनामे तलाठी वेश्वी, ग्रामसेवक दिघोडे, सरपंच दिघोडे यांनी केले होते. सदर दिघोडे गावातील नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन सिडको प्रशासनाकडून ग्रामस्थांना देण्यात आले होते.मात्र दिड वर्षे उलटूनही नुकसानग्रस्तांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही.याबाबत सिडको प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही आज दीड वर्षाहून अधिक काळ होऊन सुद्धा सिडको प्रशासन नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहे.नुकसानग्रस्त व्यक्तींची कोणीच दखल घेत नसल्याने दिघोडे येथील एकूण 18 नुकसानग्रस्त ग्रामस्थांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागणीसाठी उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनिष अनंत पाटील यांनी उरण तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

दिनांक 19/09/2022 रोजी आंदोलनाचा पहिला दिवस आहे.यावेळी रायगड जिल्हा जेष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, उपाध्यक्ष किरीट पाटील,रायगड जिल्हा काँग्रेस सरचिटणीस रामनाथ पंडित,शहराध्यक्ष प्रकाश पाटील, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, महिला तालुकाध्यक्ष रेखा घरत, महिला तालुका उपाध्यक्ष निर्मला पाटील,मच्छीमार नेते मार्तंड नाखवा,माजी नगरसेवक बबन कांबळे, विभाग प्रमुख विनोद पाटील, श्रेयश घरत, विवेक म्हात्रे, कीर्ती ठाकूर, रंजित ठाकूर, अफशा मुकरी, सदानंद पाटील,मंगेश म्हात्रे आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपोषण स्थळी उपस्थित होते. या उपोषणाला काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दिला असून ही समस्या त्वरित मार्गी न लागल्यास उपोषण अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.

(चौकट):-

सिडकोने दिघोडे गावातील ग्रामस्थांवर अन्याय केला असून जोपर्यंत दिघोडे गावातील नुकसान ग्रस्तांना आर्थिक नुकसान भरपाई मिळत नाही. तोपर्यंत हा लढा असाच सुरु राहिल. गेली दिड वर्षे पाठपुरावा करून सुद्धा जनतेला न्याय मिळत नसल्याने कायदेशीर व संविधानिक मार्गाने बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय दिघोडे गावातील नुकसानग्रस्तांनी व ग्रामस्थांनी घेतला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही मागे हटणार नाही.

– डॉ मनिष पाटील

आंदोलनकर्ते,सदस्य – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, माजी जिल्हा परिषद सदस्य.

सदर आंदोलनकर्ते यांनी माझी भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दिघोडे गावातील नुकसानग्रस्तांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी वरिष्ठाना कळविले आहे. या गोष्टीचा मी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरु केला आहे.

– भाऊसाहेब अंधारे

तहसीलदार, उरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here