दिशा बचतगट फेडरेशनच्या तीन दिवसीय प्रदर्शनीचे उदघाटन

0

बुलडाण्यात हजारो महिलांच्या साक्षीने ॲड.जयश्रीताई शेळकेंनी फुंकले विधानसभेचे रणशिंग 

बुलडाणा,(प्रतिनिधी)- 

        नारीशक्तिमध्ये प्रचंड ताकद आहे. महिलांनी एखादी गोष्ट ठरवली म्हणजे त्या पूर्ण करतात. सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे. महिलांमध्ये कमालीचा उत्साह बघायला मिळतोय. मात्र हा उत्साह केवळ नऊ दिवसांपुरता मर्यादित ठेवू नका. इथून पुढच्या काळात असाच उत्साह कायम असू द्या. नारीशक्तीच्या पाठबळाने आता थांबणार नाही तर लढणार अन जिंकणार सुद्धा असा विश्वास व्यक्त करीत दिशा बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा ॲड.जयश्रीताई शेळके यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले. 

       दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्यावतीने आयोजित महिला उद्योजक तथा बचतगट प्रदर्शनीचे आज 4 ऑक्टोंबर रोजी थाटात उदघाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. मलकापूर रोडवरील रेसिडेन्सीसमोरील मैदानात दुपारी हा कार्यक्रम झाला. उद्घाटन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ॲड.रोहिणीताई खडसे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.

       महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस हेमलताताई पाटील अध्यक्षस्थानी होत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष कोमलताई झंवर, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सचिव स्वातीताई वाकेकर, मिनलताई आंबेकर, वृषालीताई बोंद्रे, मृणालिनी सपकाळ, महिला उद्योजिका सीताबाई मोहिते, राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके, स्वातीताई कण्हेर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना जयश्रीताई शेळके म्हणाल्या, राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले असून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. मात्र सरकारला याच्याशी काही घेणे देणे नसून त्यांचा हुकूमशाही आणि दडपशाही कारभार सुरु आहे. एकीकडे लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपये अनुदानाची योजना सुरु करायची. तर दुसरीकडे महिलांच्या प्रश्नांकडे, सुरक्षीततेकडे कानाडोळा करायचा हा कुठला न्याय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बुलडाण्यात महामहिम राज्यपाल आलेले असतांना महिला शिष्टमंडळास त्यांना भेटू दिले जात नाही. दीड तास बाहेर ताटकळत ठेवले जाते यावरुन महिलांबद्दल हे सरकार किती गंभीर आहे याची कल्पना येते. त्यामुळे महिलांनी कोणत्याही आमिषाला व भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जयश्रीताई शेळके यांनी केले. कार्यक्रम सुरु होण्याआधी कीर्तनकार प्रविण दवंडे यांनी शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासह महामानवांच्या विचारांची पेरणी करत समाजप्रबोधनाचा संदेश दिला. आपल्या विनोदी शैलीत त्यांनी उपस्थितांना हसवले. संचलन वैशालीताई तायडे यांनी केले. 

       महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या १५०० रुपये अनुदान योजनेचा सर्व महिलांनी हक्काने लाभ घ्यावा. ते आपलेच पैसे आहेत. शासन काही घरुन आपल्याला पैसे देत नाही. त्यांनी पंधराशे रुपये दिले जरुर परंतु महागाई सुद्धा वाढवली. तेल, गॅस, किराणा किती रुपयांनी महागला आहे. एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे काम सरकारने केले. महिला हिशोबात पक्क्या असतात. त्यामुळे योग्यवेळी सरकारला हिशोब दाखवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिनीताई खडसे यांनी केले.  

महिला मतदारांवर महायुतीचा डोळा- सुषमाताई अंधारे 

       बहिणीला मदत करणे प्रत्येक भावाचे कर्तव्य आहे. बहिणीला केलेल्या मदतीची भाऊ कधीच जाहिरातबाजी करीत नाही. मात्र लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये देऊन मुख्यमंत्री शिंदे १० हजार रुपयांचे बॅनर लावतात. ही कुठली मदत आहे. लोकसभा निवडणुकीपासून त्यांना बहीण लाडकी झाली. आधी बहिणींची कधी आठवण झाली नाही. आता विधानसभा निवडणूक असल्याने त्यांचा महिला मतदारांवर डोळा आहे, असा घणाघात उबाठाच्या फायरब्रॅंड नेत्या सुषमाताई अंधारे यांनी केला. कार्यक्रमाला प्रचंड संख्येने उपस्थित नारीशक्तीचे त्यांनी कौतुक केले. तसेच आगामी काळात खंबीरपणे जयश्रीताई शेळके यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन केले. आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार हल्ला चढवत येणाऱ्या विधानसभेत बुलडाण्यातुन महाविकास आघाडीचा आमदार निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here