फलटण : दोन वर्षानंतर आता कुठे गायीच्या आणि म्हशीच्या दुधाचे दर काहीसे समाधानकारक असल्याने दूध उत्पादकामध्ये समाधानाचे वातावरण आहे, मात्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोणी आणि तूप शिल्लक असताना लंपी स्कीन मुळे देशांतर्गत दुधाचे उत्पादन कमी झाल्याचे कारण देत, केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने लोणी आणि तूप आयात करण्याचा विचार चालवला आहे. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा निर्णय झाला, तर तो महाराष्ट्रातील दूध उत्पादकांसाठी अडचणीचा ठरेल अशी भीती राज्यातील आघाडीच्या इंदापूरच्या सोनाई दूध प्रकल्पाचे प्रमुख असलेल्या उद्योगपती दशरथ माने यांनी व्यक्त केली आहे.महाराष्ट्रातील खाजगी आणि सहकारी दूध प्रकल्पांमध्ये लोणी आणि तूप अगोदरच शिल्लक असताना आता नव्याने जर परदेशातून लोणी आणि तूप आयात करण्याचा विचार केला, तर सध्या जे दूध उत्पादकांना दर मिळत आहेत त्यावर प्रचंड परिणाम होईल अशी भीती दशरथ माने यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या सचिवांनी नुकतीच केंद्रीय माध्यमांना माहिती देताना आठ ते दहा टक्के घटलेले उत्पादन लक्षात घेत, लोणी आणि तूप आयात करण्याचा विचार असल्याचे मत व्यक्त केले होते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दूध प्रकल्पांमध्ये खळबळ उडाली आहे.कोरोनाच्या काळात शेतकऱ्याच्या गाईच्या दुधाला २०-२२ रुपयापर्यंत दर मिळाला होता. तर म्हशीच्या दुधाला ४० रुपयापर्यंत दर मिळाला होता. त्यावेळीची स्थिती लक्षात घेता, ती स्थिती पुन्हा उत्पन्न होऊ नये यासाठी काळजी घेण्याची गरज असल्याचे मत माने यांनी व्यक्त केले. माने म्हणाले की असा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा काळा दिवस ठरेल. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. किमान १० ते १२ रुपये प्रति लिटर मागे दर कमी होऊ शकतात. सध्या राज्यातील सहकारी व खाजगी प्रकल्पांमध्ये मिळून मोठ्या प्रमाणावर लोणी आणि तूप शिल्लक आहे. सहा ते आठ हजार टन बटर शिल्लक आहे. त्यामुळे या निर्णयात बदल करावा. मुळात लोणी खाणारा वर्ग हा श्रीमंत वर्ग असल्यामुळे त्याच्या दराचा सामान्य कुटुंबावर परिणाम होत नाही. त्याचे दरही महाग असतात. या सर्वांचा विचार करता केंद्र सरकारने परदेशातून लोणी आणि तूप आयात करण्याचा निर्णय घेऊ नये अशी आमची केंद्र सरकारला विनंती आहे.