देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी छेडछाड बाबत काही तक्रार असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन गेल्या दोन दिवसापूर्वी केले असताना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील महाविद्यालयीन विद्यार्थीनीची छेडछाड करून विनयभंग केल्याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात देवळाली प्रवरा गावातील तिघांविरुद्ध पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा धाक कमी झाल्याने व संघटना व राजकीय नेत्यांकडून पाठबळ मिळत रोडरोमिओंची हिम्मत वाढली असल्याची चर्चा केली जात आहे.ज्या तरुणीची छेड काढली त्या तरुणीने चंडीकेचा अवतार धारण करुन वडीलांना सोबत छेड काढणाऱ्या तरुणाचा शोध घेतला. यातील एक तरुण बाजारतळावरील अड्ड्यावर दिसताच त्या तरुणीनेने येथेच्छा धुलाई केली.त्या दारु अड्डा चालकास मारहाण झाल्याचे समजते.
पोलिस निरीक्षक दराडे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत पीडित अल्पवयीन तरुणीने जराही न घाबरता राहुरी पोलीस ठाण्यात जावून फिर्याद दिली असता तातडीने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,देवळाली प्रवरा येथील १७ वर्षीय कॉलेजची विद्यार्थीनी आज सकाळी आपला क्लास आटोपून सायकलवरून घराकडे जात असताना रस्त्यातच तिघांनी तिला गाठून वेगळेवेगळे हातवारे केले. त्यातील एकाने हात पकडून तू मला फार आवडते, माझ्या सोबत चल असे म्हणत तिच्या अंगावरील जर्किंग ओढून तिला गाडीवर बसवण्याचा प्रयत्न करत असताना मुलीने आरडाओरड करत त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली. यावेळी मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती.
गेल्या दोन दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक दराडे यांनी रोडरोमिओ बाबतीत काही तक्रार असल्यास पोलीस ठाण्याशी किंवा मला स्वतः संपर्क करावा असे आवाहन केले होते. त्यानुसार सदर पीडित विद्यार्थीनि व तिच्या पालकांनी जराही न घाबरता राहुरी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगून रितसर फिर्याद दिली. या फिर्यादीवरून राहुल उर्फ काळ्या (पूर्ण नाव माहिती नाही),अविनाश नवनाथ धोत्रे, रोंग्या उर्फ बाबासाहेब पवार(पूर्ण नाव माहीत नाही) या तिघांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील काही आरोपी यांनी प्रेमाचा चहा या दुकानदारास बेदम मारहाण करुन लुटमार केली होती.या प्रकरणात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होते काही दिवसापुर्वी न्यायालयातुन जामिन घेवून बाहेर आली आहेत.त्याच तरुणांनी तरुणीची छेडछाड केल्याने संतप्त् नागरीकांनी या सर्वांना तडीपार करण्याची मागणी आहे.
देवळाली प्रवरा पोलिस चौकी म्हणजे असुन अडचण नसुन खोळंबा अशी अवस्था झाली आहे.या ठिकाणी सहा जणांची नियुक्ती असताना या चौकीवर थांबला तर एकच पोलिस कर्मचारी थांबतो नाहितर एक हि कर्मचारी थांबलेला दिसत नाही. येथिल पोलिस कर्मचाऱ्यांना कायम राहुरीतुन स्वतंञ ड्युटी लावली जात असल्याने ते पोलिस कर्मचारी ढुकुंण हि पहात नसल्यामुळे या पोलिस चौकीवर पोलिस पहायला मिळत नाही.
या घटनेचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा हे करीत आहे.