देवळाली प्रवरा सोसायटीचा अनागोंदी कारभार आला चव्हाट्यावर…

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी

          देवळाली प्रवरा सोसायटीचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असून सभासद शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत राजमुद्रा प्रतिष्ठाचे अध्यक्ष प्रशांत शिवाजीराव मुसमाडे यांनी सहायक निबंधकांकडे लेखी तक्रार केली असून याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

            याबाबत प्रशांत मुसमाडे यांनीदिलेल्या निवेदनात म्हंटले की, १२ जानेवारी रोजी देवळाली सोसायटी संस्थेमध्ये युरिया खत उपलब्ध झाले होते आणि १८ जानेवारी रोजी शिल्लक असतानाही संपल्याचे जाहीर करण्यात आले.सभासदांना आधारकार्डवर प्रत्येकी फक्त १ बॅग युरिया वाटप करण्यात आले काही सभासदना युरिया संपली सांगूनबाहेरील दुकानदारांना खताच्या बॅगा विकल्याचा संशय असल्याचे मुसमाडे यांनी सांगितले.

चेअरमनच्या मर्जीतील सभासद व संचालकांना १ पेक्षा अधिक बॅगा देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मागील वर्षी रासायनिक खतांच्या किमती वाढल्यानंतर जुन्या किमतीचे खत संस्थेकडे उपलब्ध असतानाही स्टॉक संपल्याचे जाहीर करून त्याच खताला नवीन किंमतीत विकण्यात आले आहे. जुन्या व नवीन किंमतीत मोठा फरक असून यामुळे आर्थिक भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप मुसमाडे यांनी केला आहे.

           देवळाली सोसायटी संस्थेच्या खत डेपो विभागामध्ये शेतकऱ्यांना युरियाची गोणी घ्यायची असल्यास डीएपी लिक्विडची सक्ती करण्यात आली आहे. २६६ रुपयांच्या युरियाची गोणी घेण्यासाठी ६०० रुपयाची लिक्विड डीएपी घेणे सक्तीचे केले असून सभासद शेतकऱ्यांवर एक प्रकारे अन्याय सुरू केला आहे. महाराष्ट्र सहकारी सोसायटी अधिनियमानुसार खत विभागाचे कागदपत्रे मागितली असता  ते देण्यास चेअरमन यांनी मज्जाव केल्याचे व्यवस्थापकाने सांगितले व माहिती देणे नाकारले आहे.आणि माहिती लपवण्याचा प्रयत्न केला असून व्यवस्थापन आणि चेअरमनवर महाराष्ट्र सहकारी सोसायटी अधिनियमाच्या कलम ७३ (१), ७८नुसार कारवाई होऊन संस्थेच्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्यात यावी. तसेच सदर संस्थेमध्ये सभादांवर अन्याय होत असून इतरही विभागामध्ये गैरकारभार सुरु आहे संस्थेतील सर्व कारभार पारदर्शी करण्यासाठी आवश्यक तशी पावले उचलावीत आणि सभासदांच्या हिताचे रक्षण करावे अशी मागणी प्रशांत मुसमाडे यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here