संगमनेर : जन्मदात्या आईचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या डोंगराएवढ्या दुःखाचे ओझे मनावर दगड ठेवून बाजूला करत या माऊलीच्या तीन मुलांनी आणि एका मुलीने आईच्या अंतिम इच्छे नुसार तिचा मृतदेह सामाजिक बांधिलकी जपत प्रवरा ग्रामीण रुग्णालयाकडे सुपूर्त केला. देहदान करणारी ही हृदय पिळवटून टाकणारी घटना संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथे घडली.
रहिमपूर तालुका संगमनेर येथे सुखदेव संभाजी शिंदे हे आपली पत्नी सुमनबाई तसेच मुले दत्तात्रय, बाळासाहेब, संपत यांच्यासह राहत आहेत. गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सुमनबाई यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र हा परिवार नानीज पिठाचे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा भक्त परिवार असल्याने महाराजांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुमनबाई सुखदेव शिंदे यांनी मृत्यूपूर्व देहदानाचा अर्ज जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान नानीज जिल्हा रत्नागिरी येथे केला होता. त्यामुळे सुमनबाई यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या मुलांनी नरेंद्रचार्य महाराज संस्थानचे नगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश बाप्पा यांना या संबंधी माहिती दिली. श्री.बाप्पा यांनी तात्काळ नानीज पिठाशी संपर्क साधला. त्यानंतर नाणीज पीठाने लोणीच्या डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीर रचना शास्त्र विभागाची संपर्क साधला. त्यानंतर या महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी रहिमपुर येथे येत सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडत देहदानाचा संकल्प केलेल्या सुमनबाई सुखदेव शिंदे यांचा मृतदेह शुक्रवार (दि.१६ )सप्टेंबर रोजी ताब्यात घेतला. तत्पूर्वी शिंदे परिवाराने हिंदू रितीरिवाजाप्रमाणे सर्व धार्मिक विधी पार पाडत एक पुतळा करून त्याच्यावर अग्निसंस्कार केले. दरम्यान एका माऊलीने हयात असतानाच देहदानाचा संकल्प केला आणि त्यांचे पती सुखदेव, मुले दत्तात्रय, बाळासाहेब, संपत, मुलगी सरस्वती रामदास अस्वले आणि सुना यांनी आपले डोंगराएवढे दुःख बाजूला सारत देहदानाचे अमूल्य,उस्फुर्त कर्तव्य पार पाडल्याबद्दल शिंदे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.