धनुष्यबाणावर प्रतिक्रिया देऊ नका, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

0

मुंबई : धनुष्यबाणावर प्रतिक्रिया देऊन नका असे आवाहन राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. पक्ष प्रवक्त्यांना सुद्धा याबाबत सूचना देण्यात आल्याचं स्पष्ट होतं आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालावर सकाळपासून वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांची प्रतिक्रिया येत असतांना, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मात्र यावर न बोलण्याची भूमिका घेतली आहे.
मनसेच्या कोणत्याही प्रवक्त्याने, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने यावर प्रतिक्रिया देऊ नयेत अशा सूचना राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

‘आमचं बाळासाहेबांवर प्रेम आहे, म्हणून आम्हाला धनुष्यबाण चिन्ह हवं आहे’
“धनुष्यबाणावर आमचाच अधिकार आहे. आम्ही रडत राहत नाही, लढत राहतो आणि तोच खरा शिवसैनिक. आमचं बाळासाहेबांवर प्रेम आहे, म्हणून आम्हाला धनुष्यबाण चिन्ह हवं आहे,” असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले.

“आमच्यावर अन्याय झालाय. विचारांपासून तुम्ही लांब गेलात, आम्ही नाही, म्हणून ही वेळ आली. आम्ही प्रतिज्ञापत्रं कधी दिली याचा तपशील आहे. जे जे आवश्यक आहे ते आम्ही दिलं आहे. आमच्याकडे काही शिल्लक नाही.

त्यांची बाजू खोटी आहे. चिन्ह आमचं आहे, ते गोठल्याचं दु:ख आम्हाला आहे. पर्यायी चिन्हासाठी त्यांची पत्रं गेली आहेत. आमचा दावा धनुष्यबाणासाठीच आहे. आम्हाला हे चिन्ह मिळायला हवं. आम्ही निवडणूक आयोगाकडे आमची भूमिका मांडणार आहोत”, असं ते म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितलं, “भारत ही सगळ्यात मोठी लोकशाही आहे. ही लोकशाही शाबूत राखण्याचं काम निवडणूक आयोगाने केलं आहे. भारतातल्या निवडणुकांची जग दखल घेतं. हरलो की घटनात्मक संस्थांची भूमिका चुकीची असं म्हटलं जातं. हे चूक आहे”.

“लोक कोणाला निवडून आणतात ही लोकशाही आहे. लोकांनी युतीला निवडून दिलं होतं. त्यांना बाजूला ठेऊन दुसऱ्याच लोकांना घेऊन सरकार स्थापन होत असेल तर युतीचा अपमान आहे. लोकांचं मत डावललं जातं त्याला लोकशाहीची हत्या म्हटलं जातं.

चिन्ह गेलं म्हणून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न. बाळासाहेबांनी सहानुभूतीचा आधार घेतला नाही. आम्ही बाळासाहेबांना मानतो. कामाने लोकांना जिंकायला लागतं. बाळासाहेबांना जसं काम अपेक्षित होतं तसं एकनाथ शिंदे गट करत आहे. असा राजकारणी दाखवा ज्याने 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण केलं आहे”, असं ते म्हणाले.

“चिन्ह गेल्यावर बाळासाहेबांचं नाव लावणार असा दावा केला जातोय. इतक्या वर्षात नाव लावावं असं का वाटलं नाही. हिंदुत्वाचा ज्यांनी अपमान केला, हिंदू देवतांना ज्यांनी शिव्या दिल्या त्या लोकांना तुम्ही व्यासपीठावर स्थान दिलंत”, अशी टीका केसरकर यांनी केली.
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रतिक्रिया दिली आहे.
इन्स्टा पोस्टमध्ये उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिलं की, “जिंकून दाखवणारच.”
युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत म्हटलंय की, “खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here