ढेबेवाडी : मराठवाडी धरणामुळे शिवाजीनगर (ता. कडेगाव) येथे पुनर्वसित झालेल्या मेंढ खुर्दच्या सुनबाईने संसार आणि घर प्रपंचातील जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे सांभाळत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवत पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे .
कोमल महारुद्र पुजारी असे या जिद्दी सुनबाईचे नाव असून, घरीच अभ्यास करून त्यांनी कष्टाने मिळविलेल्या या यशाचे सध्या मोठेच कौतुक होत आहे.
मराठवाडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील अनेक गावे सांगली जिल्ह्यात पुनर्वसित झालेली आहेत. त्यामध्ये शिवाजीनगरजवळ वसलेल्या मेंढ खुर्दचाही समावेश आहे. हे गाव काल सायंकाळी आनंदात न्हाऊन गेले. निमित्त ठरले गावच्या सुनबाईने एमपीएससीत मिळविलेल्या यशाचे. कोमल महारुद्र पुजारी यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याचे गावात समजताच ग्रामस्थांनी फटाके वाजवून, एकमेकांना पेढे भरवत आणि गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.
कोमल या मुलींमध्ये राज्यात तेराव्या, तर विशेष मागास प्रवर्गातून पाहिल्या आल्या आहेत. अकोले हे त्यांचे माहेर असून त्यांनी एमबीएची पदवी मिळविली आहे. पोलिस अधिकारी बनायचे त्यांचे पूर्वीपासूनचे स्वप्न होते लग्नानंतर पती महारुद्र यांच्या प्रोत्साहनाने त्यांच्या जिद्दीच्या पंखात अधिकच बळ भरले. महारुद्र इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून, त्यांचीही स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू आहे. यशाबद्दल सांगताना कोमल म्हणाल्या, ”दररोज आठ ते दहा तास अभ्यास करायचे मेन परीक्षेच्या काळात हा कालावधी १५ तासांवर नेला. अन्य शहरात स्वतंत्र क्लास न लावता घरीच अभ्यास केला.
ऑनलाइन क्लासद्वारे आप्पा हातनुरे, तसेच क्रीडा प्रशिक्षक तात्यासाहेब कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. आवश्यक तेथे युट्यूब आणि गुगलचीही मदत घेतली. पती महारुद्र, सासूबाई सुशीला पुजारी, आई मीना व वडील भाऊसाहेब बागडे यांचे प्रोत्साहन व पाठबळ मिळाले. सासरे (कै.) राजाराम पुजारी यांचेही आशीर्वाद पाठीशी राहिले. अजून पुढे पोलिस उपअधीक्षकपदाचे माझे स्वप्न आहे, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.” दरम्यान कोमल यांच्या यशाबद्दल धरणग्रस्त संघटनांसह विविध पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विशिष्ट चौकट घालून न घेता नेमकेपणाने अभ्यास केला. तुमच्या जवळील जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटीला जर योग्य मार्गदर्शन आणि कुटुंबाची साथ मिळाली, तर घरबसल्याही अभ्यास करून यश मिळते हा माझा अनुभव आहे.
– कोमल पुजारी