कोपरगाव- “ध्येय निश्चित करणे आणि त्याप्रमाणे लगेच कृतीला सुरुवात करणे हे स्पर्धा परीक्षेच्या वाटेवरील
पहिले पाऊल असते. कारण एकदा ध्येय ठरले की मग लगेच त्याप्रमाणे वाचन करता येते. त्यातून अभ्यासाला दिशा
मिळत जाते. अभ्यास विषयाचा आवाका ध्यानी येतो. त्यासाठी सर्वप्रथम ध्येय ठरविणे व लगेच कामाला लागणे खूप
महत्त्वाचे असते”. असे प्रतिपादन कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी केले.
येथील एस. एस.जी. एम. महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन बोरुडे यांच्या
शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंबंधी मार्गदर्शन करताना त्यांनी काही
उपयुक्त व सोप्या टिप्स दिल्या. मुलाखतीची सुरुवात स्वपरिचयातून होते, त्यामुळे ही ओळख आधी आपलीच आपण
करून घ्या. इंग्रजीचा न्यूनगंड बाळगण्यापेक्षा मराठी भाषा वापरावर भर द्या. वर्तमानपत्राचे सूक्ष्म वाचन करून टिपणं
काढा व त्याचे चिंतन करा. आवश्यक बाबींचा शोध घ्या. यासाठी समूह चर्चेचा मार्ग अवलंबा. आवड व छंद यातील
फरक समजून घेऊन छंद जोपासा. या पद्धतीने स्पर्धा परीक्षेला सामोरे गेल्यास हमखास यश मिळू शकते. असे विचार
मांडून त्यांनी विद्यार्थ्यांना या परीक्षांसाठी प्रेरित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र. प्राचार्य डॉ. आर. आर. सानप यांनी ‘थ्री इडियट’ सिनेमातील आमिर
खानच्या डायलॉगची आठवण करून देत सांगितले की, प्रत्येकाचे ध्येय वेगळे असले तरी प्रत्येकाने ध्येय निश्चिती
करणे गरजेचे आहे. यातूनच आपण स्पर्धेसाठी लायक असल्याची जाणीव जागी होऊ शकते. यश केवळ
अनुकरणातून मिळत नाही, तर त्यासाठी परिश्रम, त्याग, योगदान महत्त्वाचे असते. म्हणून पेपर वाचनाचे स्वरूप श्री.
बोरुडे यांनी सांगितल्याप्रमाणे समजून घ्यावे. वर्तमान घडामोडींची माहिती घ्यावी. महाविद्यालयात यासाठीच्या सर्व
सेवा सुविधा उपलब्ध आहेत. या सर्व सेवा सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि ध्येय निश्चिती असणाऱ्याच्या
पाठीशी यश हमखास असते. हा दृढ निश्चय मनाशी ठेवून स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाहुण्यांचा परिचय, कार्यक्रमाचा उद्देश व भूमिका स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक
प्रा.संजय गायकवाड यांनी विशद केली. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व उपप्राचार्य, सर्व विभागप्रमुख,
प्राध्यापक, क्रीडा शिक्षक प्रा. विशाल पवार, महाविद्यालयीन अधीक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी
विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. दिलीप भोये यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ.
वैशाली सुपेकर यांनी केले.