एन. आर. आय. सागरी पोलीस ठाणे, न्हावाशेवा पोलीस ठाणे व पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या ताण होणार कमी
उरण दि ११(विठ्ठल ममताबादे )
नवी मुंबई परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याशिवाय मोठमोठे उद्योग, व्यवसाय, गृहनिर्माण प्रकल्प तसेच विमानतळ देखील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात होत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची हद्द दिघा ते पनवेल, उरण पर्यंत पसरलेली आहे. मात्र आता वाढत्या लोकसंख्या पाहता यात एन. आर. आय. सागरी पोलीस ठाणे, न्हावाशेवा पोलीस ठाणे व पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या ताण कमी करण्याकारिता उलवे पोलीस ठाण्याला मंजुरी दिली आहे.
सद्य: स्थितीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत २ परिमंडळ येतात. त्यात नवी मुंबई शहरात परिमंडळ १ तर पनवेल व उरण शहरासाठी परिमंडळ २ अशी विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक परिमंडळात १० पोलीस ठाणी ४ सहाय्यक आयुक्त कार्यालय येतात. सध्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत २० पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. नवी मुंबई शहरात येणारे मोठमोठे प्रकल्प, आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्हावा शिवडी लिंक रोड, विरार अलिबाग कॉरिडोअर होत आहेत.
प्रस्तावित उलवा पोलीस ठाणे परिसरात मोठमोठ्या नागरी वस्ती, महत्वाचे प्रकल्प, रेल्वे स्थानके इ. आस्थापन सुरु आहेत. तसेच या परिसरात अंदाजे १,६०,००० इतकी लोकसंख्या झालेली आहे. वाढत्या लोक वस्तीमुळे गुन्हेगारीत वाढ होत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी सध्याच्या पोलीस ठाण्यांवर ताण पडत आहे. त्याचबरोबर अटल सेतू व शिवाजीनगर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा कोस्टल रोड असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढत आहे. सदर प्रस्तावित उलवा पोलीस ठाणेचा परिसर एन. आर. आय. सागरी पोलीस ठाणे, न्हावाशेवा पोलीस ठाणे व पनवेल शहर पोलीस ठाणे या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत समाविष्ठ आहे त्यामुळे नागरिकांना आपल्या तक्रारी, पासपोर्ट, चारित्र्य पडताळणी या नागरी सेवांसाठी अडचणींना सामोरे जावे लागते, सदर बाबी विचारात घेऊन पोलीस महासंचालक (नि. व. स), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी उपरोक्त संदर्भाधीन क्र.१ रोजींच्या पत्राद्वारे पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आस्थापनेवर एन. आर. आय. पोलीस ठाणे, न्हावाशेवा पोलीस ठाणे व पनवेल शहर पोलीस ठाण्याचे विभाजन करुन नवीन सुसज्ज उलवा पोलीस ठाणे निर्माण करण्यास व त्याकरीता येणाऱ्या रु. २,१२,३०,०००/- (रु. दोन कोटी बारा लाख तीस हजार मात्र) इतक्या अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर केला होता. सदरहू प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता. त्यानुसार एन. आर. आय. सागरी पोलीस ठाणे, न्हावाशेवा पोलीस ठाणे व पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या ताण कमी करण्याकारिता उलवे पोलीस ठाण्याला गृह विभागाने मान्यता दिली आहे. तसें आदेश गृह विभागाचे उप सचिव रा.ता. भालवने यांनी काढले आहे.