नागपूर,दि.२३ : शनिवारी रात्री २ ते पहाटे ५ दरम्यान शहरात विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे सकल भागात पावसाचे पाणी शिरले. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या सतर्कतेने एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने दुपारपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर आली. विविध ठिकाणी बचावकार्याद्वारे ४०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या घटनाक्रमात दोन महिलांचा दुर्देवी मृत्यू झाला असून १४ जनावरे दगावली आहेत.
शनिवारी रात्री २ वा. अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला, ४ तासात १०९ मि.मी. पाऊस कोसळला. यातील पहिल्या २ तासांमध्ये ९० मि.मी.पाऊस झाला. परिणामी शहरातील अंबाझरी तलावातील पाणीओव्हर फ्लो होवून नागनदीत प्रचंड प्रवाहाने शिरले. यामुळे नदीकाठावरील घरांमध्ये पाणी घुसले. अंबाझरी आणि वर्मा ले आऊट तसेच शंकरनगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी मानवी वस्तीमध्ये शिरले.
या परिस्थितीचा सामना करण्याकरिता उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाने पावले उचलली. शहरात तत्काळ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) आणि लष्कराचे प्रत्येकी दोन दल दाखल झाले व बचावकार्य सुरु झाले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागपुरसह जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. बचाव कार्यादरम्यान शंकरनगर भागातील मूक व कर्णबधिर शाळेच्या तसेच एलईडी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यासोबतच शहराच्या सकल भागात पावसाचे पाणी साचल्याने अडकून पडलेल्या नागरिकांनाही बाहेर काढण्यात आले. ४०० नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढून प्रशासनाने तयार केलेल्या निवारा केंद्रात त्यांना पाठविण्यात आले.