संगमनेर : मारहाण करून तुला घराबाहेर हाकलून देईल असा दम देऊन स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच अत्याचार केल्याची घटना संगमनेरातून समोर आली आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या आजीने नराधम मुलाच्या दुष्कृत्याचा पाढा शहर पोलिसांना कथन करत फिर्याद दिली असून नराधम बापाला शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत या पीडित अल्पवयीन मुलीच्या ५८ वर्षे वय असलेल्या आजीने असे म्हटले आहे की ती, तिचा मुलगा, पंधरा वर्षाची नात आणि तेरा वर्षाचा नातू असे सर्वजण राहतात. तिची सून अर्थात पीडित मुलीची आई दहा वर्षापासून घर सोडून निघून गेलेली आहे. दरम्यान सोमवार दि.१० ऑक्टोबर २०२२ रोजी तिची नात तिला म्हणाली की माझ्या पोटात खूप दुखत आहे. त्यामुळे तिच्या आजीने तिला घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यावर गोळ्या दिल्या. त्यानंतर त्या दोघी घरी आल्यावर आजीने पीडित नातीला विचारले की तुझ्या पोटात का दुखत आहे. त्यावर पीडित नातीने सांगितले की सहा महिन्यापूर्वी दुपारी घरात कोणीही नसताना माझ्या वडिलांनी मला मारहाण करून अत्याचार केला. मी विरोध केला असता तू जर झालेला प्रकार कोणाला सांगितला तर मी तुला घराचे बाहेर हाकलून देईल असा दम दिला. त्यामुळे वडील घराबाहेर हाकलून देतील या भीतीने तिने घरातील कोणालाही हा प्रकार सांगितला नाही. त्यानंतर पीडित मुलीच्या नराधम बापाने मागील महिन्यापर्यंत तीन-चार वेळा घरात कोणी नसताना मारहाण करत अत्याचार केला असल्याचे सांगितले. नातीची ही आपबिती एैकून वयोवृद्ध आजीला धक्काच बसला आणि तिने थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठत नराधम मुलाविरुद्ध फिर्याद दाखल केली. पीडित मुलीच्या आजीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नराधम बापाला बुधवारी सायंकाळी अटक केली. त्यानंतर काल गुरुवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे करत आहेत. दरम्यान नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने संगमनेर शहरात खळबळ उडाली आहे.