निळवंडे कालव्याचे पाणी लाभधारक क्षेत्रातील प्रत्येक गावात पोहोचवा-आ.आशुतोष काळे

0

कोळपेवाडी वार्ताहर :- समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सर्वच धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे.परंतु तापमानात झालेली वाढ पाहता उन्हाळ्याची चाहूल देखील लागली आहे. मागील वर्षी निळवंडे कालव्याच्या अधिकाऱ्यांनी उत्तम नियोजन केल्यामुळे भर उन्हाळ्यात देखील निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रात पाणी टंचाई जाणवली नाही.त्याच धर्तीवर यावर्षी देखील योग्य नियोजन करून निळवंडे कालव्याचे पाणी लाभक्षेत्रातील प्रत्येक गावात पोहोचवा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी निळवंडे कालव्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवू नये यासाठी योग्य नियोजन व्हावे याकरिता आ.आशुतोष काळे यांनी गुरुवार (दि.०६) रोजी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेतली.यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेवून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले की, निळवंडे कालव्याच्या आवर्तनातून कोपरगाव मतदारसंघाच्या लाभक्षेत्रातील सर्व बंधारे, पाझर तलाव, पाणी पुरवठा योजनांचे तलाव पूर्ण क्षमतेने भरुन द्या. वडझरी, बोडखे वस्ती, शेख वस्ती व हाडोळा पॉईंट ह्या चारही एस्केपमधून पाणी सोडा तसेच भविष्यात आवश्यक त्या ठिकाणी एस्केपची निर्मिती करावी.

या बैठकीत आ.आशुतोष काळे यांनी निळवंडेच्या इंजिनिअर विभागाचे कार्यकारी अभियंता हापसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून नियोजित वितरीकांचा आराखडा तयार करून त्या आराखड्यास मंजुरी घेण्याच्या सूचना केल्या. सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर कालव्यांवर तातडीने एस्केप तयार करून घ्यावेत. जेणेकरून भविष्यात प्रत्येकवेळी कालवे फोडण्याची वेळ येणार नाही व पाणी देतांना कोणत्याही अडचणी येणार नाही. ज्या ठिकाणी पाणी पोहोचविण्यात अडचणी येतील व सांडवे उकरावे लागणार आहे त्या ठिकाणी आवश्यकता असल्यास जे.सी.बी.,पोकलॅन मशीन उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले जाईल. मात्र पाण्याच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत याची निळवंडेच्या अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी जवळकेचे माजी सरपंच बाबुराव थोरात,रांजणगाव देशमुखचे सरपंच गजाजन मते, अंजनापुरचे माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे संचालक संतोष वर्पे, संपतराव खालकर, निळवंडे पाटबंधारे विभागाचे अभियंता महेशजी गायकवाड, शाखा अभियंता साबळे आदी अधिकारी व लाभक्षेत्रातील शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here