उत्तम बागल;सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांना विविध जिल्ह्यांमध्ये सोयी-सुविधा देण्यासाठी राज्य सरकारने ३४ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी देण्याचे आदेश जारी केले आहेत. देशभरातून येणाऱ्या वारकऱ्यांना स्वच्छतागृहांपासून पिण्याच्या पाण्यापर्यंत सर्व सुविधा या निधीतून पुरविण्यात येतील.
ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत २०२५४-२५ या आर्थिक वर्षासाठी ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. २०१७-१८ पासून अशा प्रकारे निधी देण्यात येत आहे. त्यातून पंढरपूरच्या वारीसाठी हा निधी देण्यात आला आहे.
वारीसाठी ग्रामविकास विभागाच्या वतीने वारकऱ्यांना विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. आषाढी एकादशीनिमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत जाणाऱ्या भाविकांना स्वच्छतागृहांची सुविधा पुरवण्यात येईल. त्यासाठी २१ कोटी ६७ लाख ५० हजार रुपये देण्यात येतील.
तसेच सातारा व सोलापूर जिल्ह्यांतून येणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या वारकऱ्यांसाठी तीन कोटी ५६ लाख ९१ हजार ७६९ रुपयांचा अतिरिक्त निधी दिला जाईल. या व्यतिरिक्त ३ कोटी ४६ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मंजूर केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील संत निवृत्तीनाथ पालखीसोबतच्या वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी २ कोटी २४ लाख ६६ हजार, जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताई यांच्या पालखीसोबतच्या वारकऱ्यांसाठी ३ कोटी ४१ लाख १९ हजार ३०० रुपयांचा निधी मिळेल.