सातारा : मराठी दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे तसेच महानगरीय जीवन व बोलीभाषा यावरील महत्वाचे लेखन करणारे पद्मश्री कवी नामदेव ढसाळ आणि तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या संयुक्त स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गौरव जाधव, चंद्रकांत खंडाईत,संजय कांबळे, सुनील बडेकर,दीपक बनसोडे,अजय गुरसाळे,शुभम भिसे,बाबाजी आवाडे,पवन कुंभार,सागर वायदंडे,ऍड.विलास वहागावकर, डॉ.बाबासाहेब ननावरे,अनिल वीर,जगताप, अडागळे आदी मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
विठाबाई नारायणगावकर यांना महाराष्ट्रातील तमाशा सम्राज्ञी म्हणून ओळखले जाते. राज्यातील तमाशा रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या भारतीय गायिका आणि नृत्यांगना म्हणून त्यांची ओळख होती.भाऊ बापू नारायणगावकर आणि त्यांचे भाऊ दोघे मिळून पंढरपूरमध्ये तमाशा मंडळ चालवत होते. लहानपणापासूनच नृत्याची आवड लागल्यानतर त्यांनी बहिण केशरबाई यांच्या मार्गदर्शनात उत्तम नृत्यकला प्राप्त केली.एकोणिसाव्या शतकात प्रत्येक गावात जत्रा असली की तमाशाचे फड रंगत असायचे. यातूनच विठाबाई रसिकांच्या भेटीला आल्या आणि आपल्या अदाकारीने रसिकांच्या मनावर हुकमत गाजवली.विठा भाऊ नारायणगावकर यांचा वर्ण जरी सावळा असला तरीदेखील त्यांचा गोड गळा, नृत्याविष्कार आणि उत्तम अभिनयाने त्यांनी रसिकांच्या मनात कायमचे घर केले होते. आजही तमाशाचे नाव काढले, की विठाबाई भाऊ नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ आपल्याला आठवतो.
” पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची !” ही लावणी विठाबाई यांनी अजरामर केली. यासोबतच मुंबईची केळेवाली, रक्तात न्हाली कु-हाड…. असे अनेक प्रसिद्ध वगनाट्य सादर केले होते. जे आजही तितकेच लोकप्रिय आहेत. विठाबाईंचे रूप,अदा आणि नृत्य या सार्यांची प्रेक्षकांवर खूपच मोहिनी होती. त्यामुळे विठाबाईंना तमाशाची राणी म्हणून ओळखले जाऊ लागले.पोटापेक्षा कलेसाठी नाचणारी विठाबाई गरोदर असतानाही स्टेजवर नाचत होत्या. नाचता नाचता पोटात बाळंतपणाच्या कळा आल्यावर त्या स्टेजच्या मागे असणा-या तंबूत गेल्या. तिथे विठाबाई यांनी बाळाला जन्म दिला.बाळाची नाळ दगडाने ठेचून विठाबाई परत स्टेजवर आल्या.मुलगा झाल्याची बातमी देऊन पुन्हा नाचायला सुरुवात केली. सर्व प्रेक्षक मंडळी हात जोडून विठाबाईंना विनंती करत होते. “आराम करा,आमचे पैसे फिटले.”