फलटण (सातारा) : शरद पवार यांना मी दोनवेळा भेटलो, अशा बातम्या सुरू आहे. पण ज्या माणसाने मी आमदार नसताना मला मंत्री केले, विधान परिषदेचे सभापती केले, त्या माणसाला पक्षफुटीवेळी सोडून मी अजित पवार यांच्याकडे गेलो.
कुठल्या तोंडाने मी त्यांना भेटू….? असे सांगताना रामराजे नाईक निंबाळकर काहीसे भावुक झाले होते. घराण्याची अशी परंपरा नसताना केवळ जनतेला संरक्षण मिळेल म्हणून मी शरद पवार यांना सोडण्याचा निर्णय घेऊन अजितदादांकडे गेलो. हा निर्णय घेताना माझ्या जीवाला काय व्यथा झाल्या असतील, हे माझे मला माहिती, असे ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये शनिवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांबद्दल तक्रारींचा पाढा वाचत त्यांच्याविषयी अजित पवार आणि महायुतीच्या नेत्यांना कळवले सांगितले. आम्हाला न्याय मिळत नसेल आणि कार्यकर्ता घरी बसणार असेल, कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न होणार असेल तर आम्ही काय करायचे? असा उद्विग्न सवाल करत मला तुतारीकडे जा असे कार्यकर्त्यांनी सांगणे हा ऐतिहासिक क्षण असल्याचे ते म्हणाले. यानिमित्ताने त्यांनी शरद पवार गटात जाण्यासंबंधीचे संकेतही दिले.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात भाजपचे नेते, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माण विधानसभेचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर सडकून टीका केली. केंद्रीय गृहमंत्री-सहकारमंत्री अमित शाह जिल्हा बँकेच्या कार्यक्रमाला येणार होते. पण माण आणि दहिवडीमधून फोन गेले. राज्य आणि देश पातळीवरील नेतृत्वानेही त्यांना साथ दिली. असे असेल तर आम्ही काय करायचे? अशी विचारणा रामराजेंनी केली.
आज दिवसभर मी अजित पवारांना सोडून जाणार, अशा बातम्या माध्यमं देत होती. आपल्या विरोधकांनी या कंड्या पिकवल्या का? हे पाहावे लागेल. कारण त्यांना असले उद्योग करण्याची घाण सवय आहे. कारण आपण पवारसाहेबांकडे गेलो तर भाजपच्या चिन्हावर त्यांना फलटणची जागा लढायला मिळेल, असा त्यांचा उद्देश असेल, असेही रामराजे म्हणाले.
फलटण तालुक्याचे सलग चौथ्यांदा दिपक चव्हाण हे आमदार व्हायला निघाले आहेत. त्यांना आपण पुन्हा निवडून द्यायचंय. फलटणमध्ये कुणीही चौथ्यांदा निवडून आले नाही. पण यंदा दिपक चव्हाण यांच्यामागे आपल्याला ताकदीने उभा राहायचे आहे. दिपक चव्हाण तुम्हाला बोलताना वागताना विचार करुन, जबाबदारीनं वागावं लागेल. आमच्या घराण्याचं राजकीय कल्चरही सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावरच आहे. आतापर्यंत तुम्ही व्यवस्थित सगळं पार पाडलं, आताही पाडाल, अशी अपेक्षाही रामराजेंनी बोलून दाखवली
पवार साहेब आज सत्तेत नाही. त्यामुळे आपण अजितदादांकडून अपेक्षा ठेवली आहे, कारण ते सत्तेत आहेत. अपेक्षा जो पर्यन्त पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी माझ्या लोकांना काही उत्तरं देऊ शकत नाही. अशी परिस्थिती माझ्या नेत्याने माझ्यावर आणू नये, असेही रामराजे म्हणाले.