उरुळी कांचन, ता. १४ : वेगावरील नियंत्रण सुटल्याने मोटार १०० पसरणी घाटात मीटर दरीत कोसळून झालेल्या अपघातात लोणी काळभोर (ता. हवेली) येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात गुरुवारी (ता. १३) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
अक्षय म्हस्कू काळभोर (वय २६), सौरभ जालिंदर काळभोर (वय २६), अशी या अपघातात मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. तर, वैभव काळभोर, बजरंग पर्वतराव (वय ३५, सर्व रा. रायवाडी, लोणी काळभोर) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. दोन्ही जखमींना वाई (जि. सातारा) येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
अक्षय, सौरभ, वैभव आणि बजरंग हे दोन दिवसांपूर्वी त्यांची एंडेवर मोटार घेऊन कोकणात फिरायला गेले होते. गुरुवारी (ता. १३) ते घरी परतत असताना पसरणी घाटात मोटारीच्या वेगावरचे नियंत्रण सुटले आणि मोटार १०० मीटर दरीत कोसळली. यात अक्षय आणि सौरभ यांचा जागीच मृत्यू झाला, तर मित्र वैभव आणि बजरंग गंभीर जखमी झाले.