सिन्नर : पाडळी येथील Pataleshwar vidyalaya पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात भारतरत्न भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून पुणे येथील समकालीन प्रकाशन पुणे या सामाजिक संस्थेने विद्यालयास विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी ग्रंथालयीन पुस्तके भेट दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख होते. मान्यवरांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी प्रास्ताविकेतून सौ. सविता देशमुख यांनी ग्रंथालय प्रमुख म्हणून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या ग्रंथालयातील असणाऱ्या पुस्तकांचा उपयोग आपल्या जीवनात अनेक विविध अंगी ज्ञान मिळविण्यासाठी करावा. पुस्तकांमुळे मानवाचे जीवन समृद्ध होते. विचार करण्याची क्षमता आपोआप वाढीस लागते. वाचनामुळे माणूस विचारवंत बनतो.वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे आपण आपल्या जीवनात डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासारखे खूप मोठे होण्यासाठी वाचनाची आवड स्वतःमध्ये निर्माण करा. डाॅ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे चरित्र वाचून आपणही एक शास्त्रज्ञ बनूया अशी मनाशी खून गाठ बांधा असे सांगितले. श्रीम.सी.बी. शिंदे यांनी डाॅ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या चरित्रातील अनेक पैलू विद्यार्थ्यांसमोर उलगडून त्यांचे जीवन चरित्र व आपण त्यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून का साजरी करावी हा उद्देश स्पष्ट केला. बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना पर्यटनापेक्षा वाचन स्वस्त आहे. ज्ञानप्राप्तीचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे पुस्तकांचे वाचन होय. वाचनाला वेळेचे, काळाचे बंधन नसते. वाचनामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. वाचनाने मानवाची बुद्धी तलक बनते. वाचनामुळे आपल्या जीवनात अनेक यशस्वी बदल घडून येऊ शकतात म्हणून जीवनात अधिकाधिक पुस्तकांचे वाचन करा.मोबाईल संस्कृतीमुळे आज वाचन संस्कृती लोप पावत आहे. ज्ञानप्राप्तीचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे पुस्तकांचे वाचन होय. असा मौलिक सल्ला दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. व्ही. निकम यांनी केले व आभार प्रदर्शन बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक टी.के. रेवगडे यांनी मानले.