उरळीकांचन : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील नगारा अडवणे उरुळी कांचन गावकऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. नगारा अडवून पालखी सोहळ्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी संरपंचासह १५ ते २० पदाधिकारी व ग्रामस्थांवर गुन्हा दाखल केला आहे.
अमित कांचन (सरपंच), भाउसाहेब कांचन (माजी सरपंच), अलंकार कांचन, संतोष उर्फ पप्पू कांचन, प्रताप कांचन, राजेंद्र कांचन व इतर १५ ते २० पदाधिकारी व ग्रामस्थ, (सर्व राहणार उरूळी कांचन ता. हवेली जि. पुणे) अशी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल राजकुमार भिसे यांनी फिर्याद दिली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवड जेजुरी मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ झाला असून संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सोलापूर रस्त्यावरून बारामती मार्गे पंढरपूरकडे जात आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने बुधवारी उरुळी कांचन गावात प्रवेश केला. वर्षानुवर्षं चालू असणाऱ्या परंपरेप्रमाणे पालखी सोहळा आश्रम रोड मार्गे तळवाडी चौकातून गावाला प्रदक्षिणा घालून पुढे यवत ला मार्गस्थ होतो. तसेच उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील प्रागंणात दोन तासाच्या विसाव्यासाठी थांबतो.
पालखी सोहळा उरुळी कांचन येथे दोन तासाच्या विसाव्यासाठी येणार असल्याने महात्मा गांधी विद्यालयातील प्रागंणात वारकऱ्यांसाठी मंडप उभारण्यात आला होता. ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून विद्यालयाच्या प्रागंणात हिरकणी कक्ष, महाप्रसाद, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधान गृह आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.
मात्र, यावर्षी संत तुकाराम महाराज सोहळा प्रमुख व विश्वस्तांनी सोहळ्याचा मार्ग बदलला. सोहळ्याच्या प्रवासाचा तपशील पूर्वीच जाहीर केला होता. त्यामध्ये उरुळी कांचन गावातील विसावा रद्द करून, तो उरुळी कांचन फाट्यावर होईल असा उल्लेख केला होता. मात्र, सोहळा प्रमुख व विश्वस्तांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत गावातील नेते मंडळी, पदाधिकारी व ग्रामस्थांनी येथील एलाईट चौकात पालखी सोहळ्याचा नगारा आडवत घोषणा बाजी केली.
दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांनी सरपंचासह वीस ते पंचवीस पदाधिकारी व ग्रामस्थांवर गुन्हा दाखल केला आहे.