फलटण प्रतिनिधी श्रीकृष्ण सातव.:
महाराष्ट्रातील आळंदी व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची आज शनिवार दि. 11 मार्च रोजी खा. रणजीत सिंह नाईक निंबाळकर व अधिकारी यांच्यासह हवाई पाहणी केली.त्यानंतर पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गाच्या कामाचा आढावा घेत जून महिन्यापर्यंत 70 टक्के काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली.तसेच पाटस ते बारामती आणि बारामती, इंदापूर, अकलूज, श्रीपुर, तोंडले भोंडले, या मार्गावरील चालू असणाऱ्या आणि नियोजित कार्यवाहीचा त्यांनी यावेळी तपशील दिला.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – ९६५) हा २३४ किमी लांबीचा मार्ग हडपसर (पुणे) – सासवड – जेजुरी – निरा – लोणंद – फलटण – नातेपुते – माळशिरस – बोंडले – वाखरी – पंढरपूर असा असून या चौपदरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आला आहे. या मार्गावर एकूण १२ पालखी स्थळे असून याठिकाणी वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येतील.
सदर पालखी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंस वृक्षारोपण करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि बाबींवर आधारित काम करण्यात येईल. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल तसेच वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल.पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये विशेषतः चंदन,तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यात ५७,२०० व दोन्ही बाजूस मिळून १८,८४० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या महामार्गामुळे होणाऱ्या विकासाचाही आढावा त्यांनी घेतला.