संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये प्रथम वर्ष बी. टेक.विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा संपन्न
कोपरगांव: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजला मागील चार दशकांपेक्षा मोठी यशस्वी परंपरा आहे. आज संजीवनीचे माजी विद्यार्थ्यांनी नासा पासुन ते इस्त्रो आणि महिंद्रा पासुन ते टेस्ला कंपनी पर्यंत मजल मारली आहे. तसेच काही माजी विद्यार्थी देश परदेशात उच्च पदस्थ अधिकारी आहे तर काहींनी स्वतःचे उद्योग सुरू करून इंतरांच्या हातांना काम दिले आहे, हे पालकांच्या सहकार्याने शक्य झाले, म्हणुन पुढील चार वर्षांच्या काळात पालकांनी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजला सहकार्य करावे, आपल्या पाल्यांचे पुढील चाळीस वर्षे आनंदात जातील, असे आवाहन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी केले.
संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये बी. टेकच्या विविध विद्या शाखांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी मार्गदर्शन मेळावा आयोजीत केला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून कोल्हे बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार सतिश वैजापुरकर प्रमुख पाहुणे होते. सदर प्रसंगी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, पत्रकार मनोज जोशी , सर्व विभागांचे विभाग प्रमुख, डीन्स मंचावर उपस्थित होते. सजग पालकांची संख्या उल्लेखनिय होती.
प्रारंभी डीन अकॅडमिक्स डॉ. ए. बी. पवार यांना सर्व उपस्थितांचे स्वागत करून पालक मेळाव्याचा हेतु स्पष्ट केला.इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींगचे विभाग प्रमुख डॉ. बी. एस. आगरकर यांनी सन १९८३ पासुनचा महाविद्यालयाचा प्रगतीचा आलेख सादर करून विविध उपलब्धींना स्पर्श केला, तसेच संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजला आटोनॉमस दर्जा प्राप्त असल्यांने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२० चा अंतर्भाव अभ्यासक्रमात केला असल्याचे सांगीतले.
कोल्हे पुढे म्हणाले की माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनीची वाटचाल चालु आहे. संजीवनीच्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होवुन त्यांना भविष्यात चांगल्या करीअरच्या संधी निर्माण होण्यासाठी संजीवनी इंटरनॅशनल डीपार्टमेंटच्या पुढाकाराने जगातील ९ देशातील आकरा नामांकित विद्यापीठांशी सामंजस्य करार (एमओयु) केले आहेत. या संधीचा फायदा घेत, विद्यार्थ्यांना हवे ते मार्गदर्शन करून आत्ता पर्यंत सुमारे ८५ विद्यार्थ्यांनी परदेशी विद्यापीठांच्या खर्चाने रिसर्च इंटर्नशिप (संशोधन आंतरवासिता) पुर्ण केली आहे. सात विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या खर्चाने एम.एस.(इंजिनिअरींग मधिल पदव्युत्तर पदवी) पुर्ण करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी येथे संगीत, गायन, खेळ, असे वेगवेगळे क्लब स्थापन करण्यात आले असुन विद्यार्थी या क्लबच्या मार्फत आपला छंद जोपासु शकतात, यामुळे संजीवनीचे विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर देखिल विविध स्पर्धा जिंकतात. तसेच आपल्या विद्यार्थ्यांना परदेशात नामांकित कंपन्यांमध्येही करीअरच्या संधी मिळाव्यात या हेतुने जापनीज, रसियन, जर्मन, कोरीअन अशा भाषांचेही प्रशिक्षण तज्ञ ट्रेनर्सच्या माध्ममातुन देण्यात येत आहे, असे कोल्हे शेवटी म्हणाले.
सतिश वैजापुरकर म्हणाले की संजीवनी हे ज्ञानदानाचे व्यासपीठ असुन आपल्यां पाल्यांच्या उत्कर्षासाठी संजीवनीने जगाचे दरवाजे खुले केले आहे. एका खेडेगावातील कधीही आपले गाव न सोडलेली मुलगी संजीवनीच्या प्रयत्नाने जपानमध्ये नोकरीसाठी जाते, हे या संस्थेचे फलित आहे. यामुळे शैक्षणिक क्रांती बरोबरच आर्थिक व सामाजिक क्रांती येथुन होताना दिसत आहे. जगात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असल्यांने आपल्या पाल्यांनाही त्यांच्यात बदल करण्यास प्रवुत्त करावे. पालकांनी आपल्या पाल्यांमध्ये दुर्दम्य आशावाद निर्माण करावा, ते या युगांतरातील प्रवासी आहे. त्यांना कम्फर्ट झोनच्या बाहेर काढावे, जो पर्यंत ते जोखिम स्वीकारत नाही, तो पर्यंत त्यांची प्रगती समाधानकारक होणार नाही, असे मतही वैजापुरकर यांनी व्यक्त केले.
डीन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग डॉ. विशाल तिडके यांनी सुत्रसंचालन केले तर प्रथम वर्षाचे प्रमुख डॉ. बी. आर. शिंदे यांनी आभार मानले.