पुणे : सध्या पुणे जिल्ह्यासह अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढत आहे. राज्यभरात उन्हाचा कडाका वाढला आहे. अनेक ठिकाणी 35 अंशाच्या वरपर्यंत तापमान पोहोचले आहे.
दरम्यान उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. दरम्यान उन्हाच्या झळा बसत असतानाच हवामान विभगाने राज्यासाठी एक इशारा दिला आहे. आयएमडीने राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आयएमडी म्हणजे हवामान विभागाने राज्याला पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासाह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासाह पाऊस होऊ शकतो असे हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यावर सध्या उष्णतेची लाट आणि जोरदार पाऊस असे दुहेरी संकट पाहायला मिळत आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याला अवकळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा, लातूर , धारशिव, मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्राची ‘भाग्यलक्ष्मी’ म्हणून ओळख असलेल्या कोयनेच्या पाणीसाठ्यात घट
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना नदीच्या शिवसागर जलाशयाची पाणीपातळी तीव्र उन्हाळ्याने घटू लागली असून नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात उघडे पडू लागले आहे, त्यामुळे जलाशयातील बेटे दिसू लागली आहेत. १०५ टीएमसी क्षमता असलेल्या कोयनेची पाणी पातळी यावर्षी शंभर टक्के भरली होती. सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे वीज निर्मिती, शेतीसाठी व पिण्याचे पाणी, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन यामुळे पाणी दिवसेंदिवस वेगाने कमी होत आहे. त्यामुळे आगामी काळात प्रशासनाला पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.
पाणी पातळी घटल्याने बामणोली, तापोळा भागातील मुख्य दळणवळणाचे साधन असलेल्या बोटी चालवणे अवघड बनत आहे. पात्र उघडे पडू लागल्याने उन्हातान्हात पात्रातून लोकांना पायपीट करावी लागत आहे. विशेषतः सोळशी व कोयना नदीच्या खोऱ्यातील तापोळ्याच्या वरील भागातील पाणी वेगाने कमी होवून या भागातील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर या भागातील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठीही नदीपात्रातील पायी चालण्याचे अंतर वाढत आहे. त्यामुळे पर्यटक संख्या ही कमी होवू लागली आहे.