पुणे सातारा हायवेवर कंट्रोल सुटला, भरधाव स्विफ्ट पहिल्या लेनमध्येच उलटली! चारही जण.

0

पुणे,विनय जगताप : शनिवारी नाशिकमध्ये  झालेल्या बसच्या भीषण अपघातात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघाताची ही घटना ताजी असतानाच आता पुणे-सातारा हायवेवर भीषण अपघात घडलाय.
एक भरधाव स्विफ्ट कार  पुणे सातारा हायवेवर उलटली. हा अपघात घडला त्यावेळी कारमध्ये चार प्रवासी होते. हा अपघात इतका भीषण होता, की खाली डोकं वर पाय केल्याप्रमाणे स्विफ्ट कारची अवस्था झाली होती. कारची चारही चाकं आभाळाच्या दिशेने तर स्विफ्ट कारचं छत हे पूर्णपणे रस्त्याला टेकलं होतं.

कशामुळे झाला अपघात?

पुणे सातारा महामार्गावरील निगडे गावच्या हद्दीमध्ये सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. भरधाव वेगामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे. स्विफ्ट कारच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हायडरला धडकून हायवेवरच पहिल्या लेनमध्ये उलटली होती.

4 प्रवाशांचं काय झालं?

या भीषण अपघातातून कारमधील चारही प्रवासी अगदी थोडक्यात बचावले. कारमधील प्रवाशांना किरकोळ जखम झाली आहे. साताऱ्याहून ही स्विफ्ट कार पुण्याच्या दिशेने येत होती. या अपघातात स्विफ्ट कारचं प्रचंड नुकसान झालं.

या अपघातामुळे पुणे-सातारा हायवेवरील वाहतुकीवरही परिणाम झाला होता. बराच वेळ या महामार्गावरची वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, मोठ्या अपघातातून वाचल्यानं कारमधील प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय कारमधील प्रवाशांना आला. या अपघातामुळे पुन्हा एकदा वाहनं वेगाने चालवणं जीवावर बेतू शकतं, हे अधोरेखित झालंय. या अपघातामुळे हायवेवरही बघ्यांची गर्दी जमली होती. तर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा वेगही मंदावला होता. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here