पूजा खेडकरची प्रशिक्षणार्थी उमेदवारी UPSC कडून रद्द

0

भविष्यात सर्व परीक्षा देण्यावरही बंदी

केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीने पूजा खेडकरविरुद्ध कारवाई केली असून तिचे प्रशिक्षणार्थी IAS पद रद्द करण्यात आले आहे. त्याचबरोबर भविष्यातील सर्व परीक्षांना बसण्यास पूजा यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. यूपीएससीने केलेल्या चौकशीत पूजा खेडकरने नागरी सेवा परीक्षा-2022च्या नियमांचा भंग केल्याचं समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

यूपीएससीने 19 जुलै 2024 रोजी एक पत्रक प्रसिद्ध करून पूजा खेडकर यांनी स्वतःच्या नावात, त्यांच्या वडिलांच्या नावात तसेच आईच्या नावात बदल करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याचं समोर आल्याचं म्हटलं होतं. पूजा खेडकर यांनी परीक्षेचा फॉर्म भरत असताना फोटो, सही, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून परीक्षा देण्याची कमाल मर्यादा ओलांडली असल्याचंही यूपीएससीने स्पष्ट केलं होतं.

यूपीएससीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, पूजा खेडकर नागरी सेवा परीक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना 18 जुलै 2024 रोजी नागरी सेवा परीक्षा-2022च्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पूजा खेडकर यांनी आपली खोटी माहिती देत परीक्षा देण्याची कमाल मर्यादा ओलांडली असल्याचं यूपीएससीने म्हटलं होतं. 34 वर्षीय पूजा खेडकर यांना 25 जुलै 2024 पर्यंत बाजू मांडण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, तिने 4 ऑगस्टपर्यंत वेळ वाढवून मागितला. यूपीएससीने तिला 30 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आणि ही शेवटची संधी असून त्यापेक्षा जास्त वेळ दिला जाणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. मात्र, या वाढवून दिलेल्या मुदतीतही पूजा खेडकरने आपली बाजू न मांडल्यामुळे यूपीएससीने ही कारवाई केली आहे.

याआधी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा प्रशिक्षण कालावधी स्थगित करण्याचा आदेश महाराष्ट्र सरकारनं दिला होता.पूजा खेडकर यांचा वाशिम येथील जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले होते.लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली होती.

चौकशीसाठी समितीची स्थापना

पूजा खेडकर यांच्या प्रकरणात चौकशीसाठी केंद्र सरकारनं एका समितीची स्थापना केली होती. ही समिती पूजा खेडकर यांच्या निवडीबाबत करण्यात आलेले दावे आणि इतर तपशिलांची चौकशी करणार होती. दरम्यान पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. 11 जुलैला त्या वाशिममध्ये कर्तव्यावर रुजू झाल्या होत्या.प्रशिक्षणाच्या काळातच पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडं अवास्तव मागण्या केल्यामुळं आणि अरेरावी वर्तनामुळं त्यांच्याबाबत प्रचंड चर्चा झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here