कोल्हापूर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे एका जुन्या विहिरीच्या काठावरील छोटे नृसिंह मंदिर अचानक विहिरीत कोसळले. रविवारी (दि. २०) सकाळी ही दुर्घटना घडली तेव्हा पुजारी कृष्णात शामराव दांगट (वय ६०, रा.गडमुडशिंगी) हे मंदिरात पूजा करीत होते. ग्रामस्थांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गडमुडशिंगी गावाजवळ शेतात एका जुन्या विहिरीच्या काठावर छोटे नृसिंह मंदिर होते. या मंदिरातील पूजेचे काम पुजारी कृष्णा दांगट हे करीत होते. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ते पूजेसाठी मंदिरात गेले होते. त्यावेळी अचानक मंदिर विहिरीत कोसळले. हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी धाव घेऊन दांगट यांचा शोध सुरू केला. जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्याकडून दांगट यांचा शोध सुरू आहे. गांधीनगर पोलिस घटनास्थळी पोहोचले असून, बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.