मुंबई :लेखक आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना मुंबई हायकोर्टानं एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. प्रा. तेलतुंबडे यांना भीमा कोरेगाव-एल्गार परिषद प्रकरणात 14 एप्रिल 2020 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.
प्रा. तेलतुंबडे यांना जामीन मिळाला असला, तरी त्यांना आणखी आठवडाभर तुरुंगातच राहावं लागणार आहे. कारण NIA नं सुप्रीम कोर्टात अपिल करण्यासाठी वेळ मागितला होता. तो वेळ हायकोर्टानं दिल्यानं प्रा. तेलतुंबडेंना आठवडाभर तुरुंगातच राहावं लागेल.
प्रा. तेलतुंबडे यांना अवैध कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या अन्वये (UAPA) अटक करण्यात आली होती.31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेचे संयोजक प्रा. आनंद तेलतुंबडे होते, असा आरोप एनआयएनं ठेवला होता. या परिषदेनंतर भीमा कोरेगाव दंगल झाल्याचा आरोप आहे. या दंगलीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
खंडपीठाने असंही म्हटलं की NIA ला तेलतुंबडे यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी फक्त कलम 39 आणि 39 (दहशतवादी संघटनांशी संबंध) दाखवता आले आहेत.
या गुन्ह्यांसाठी जास्तीत जास्त शिक्षा 10 वर्षे आहे, तेलतुंबडे आत्तापर्यंत 2 वर्षे तुरुंगात आहेत. त्यामुळे याचिकाकर्त्यांना जामीन देण्यासाठी ही योग्य केस आहे असं न्यायालयाने म्हटलं.
याआधी याच प्रकरणातील वरवरा राव यांना वैद्यकीय कारणासाठी आणि सुधा भारद्वाज यांनाही मुंबई हायकोर्टानं जामीन दिलाय.