येवल्यात जागतिक फार्मसी दिनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन
येवला, प्रतिनिधी…….
फार्मसी परिषदने भारत सरकारच्या कौशल्य भारत विभाग आणि प्रशिक्षण केंद्र म्हणून काम करणाऱ्या राज्य परिषद यांच्या सहकार्याने फार्मासिस्टच्या प्रशिक्षणासाठी दक्षिण भारतात दहाहून अधिक प्रशिक्षण केंद्रे सुरू केली आहेत. २५ हजारांहून अधिक फार्मासिस्टला या प्रशिक्षण केंद्रांचा लाभ मिळतो असे प्रतिपादन फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. मोंटूकुमार पटेल यांनी केले.
येथील मातोश्री एज्युकेशन सोसायटी,जगदंबा एज्युकेशन सोसायटी,संतोषीमाता बहुउद्देशीय शिक्षण संस्था तसेच केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन,राज्य फार्मसी कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मासिस्ट दिन महात्मा फुले नाट्यगृह येथे उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.पटेल बोलत होते.यावेळी महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष अतुल अहिरे, एफडीएचे सहाय्यक आयुक्त मिलिंद पाटील, नाशिकचे औषध निरीक्षक चंद्रकांत मोरे, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुदेश आहेर,संचालक रवींद्र पवार,जगदंबा व मातोश्री एज्युकेशन सोसायटीचे संचालक रूपेश दराडे,संकेत दराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पटेल यांनी डी.फार्मसी विद्यार्थ्यांसाठी एक्झिट परीक्षा अपडेट करण्याची प्रक्रिया, जीपॅट स्टायपेंड आणि १३ देशांसोबतचे सहकार्य तसेच फार्मसी कौन्सिलशी संबंधित भविष्यातील बदल आदी विषयावर विशेष माहिती दिली. यावेळी श्री.अहिरे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा,मॉडेल मेकिंग स्पर्धा, डिबेट स्पर्धा आदी सहभागी झालेल्या विद्यार्थी स्पर्धकांना फार्मा चॅम्पियनशिपने पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी फार्मासिस्ट म्हणून मी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावेल या आशयाची पाहुण्यांसह विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.मातोश्री फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या व संचालिका डॉ.रसिका भालके यांनी स्वागत केले तसेच एस.एन.डी. कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.प्रद्युम्न इगे,एकलहरे मातोश्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोकुळ तळेले,एसएनडी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या
प्राचार्य वंदना संचेती,एमएबीडी फार्मसीचे प्राचार्य डॉ. विवेकानद काशीद,संतोषीमाता संस्थेच्या फार्मसीचे प्राचार्य डॉ. व्यंकटेश्वर राव,विभागप्रमुख डॉ.पवन आव्हाड यांची विशेष उपस्थिती होती.मातोश्री फार्मसी कॉलेजचे विभागप्रमुख डॉ.पवन आव्हाड यांनी संयोजन केले.संकेत दराडे यांनी आभार मानले.
“मातोश्री व जगदंबा शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरी,रोजगार मिळाला पाहिजे हा आमचा संकल्प आहे.त्यादृष्टीने विविध उपक्रम,स्पर्धा,मार्गदर्शन व कंपनी भेटी आम्ही आयोजित करतो.त्या अंतर्गत फार्मा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील संधी विषयक सुंदर मार्गदर्शन मिळाले.विद्यार्थ्यांनीही या क्षेत्रात उपलब्ध संधीचा लाभ घेऊन चांगले करिअर करावे.”