देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
डॉ. तनपुरे साखर कारखाना प्रश्नी जिल्हा बँकेत २० जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करू, असे आश्वासन पारनेरचे आमदार निलेश लंके व जिल्हा बँकेचे संचालक अरुण तनपुरे यांनी दिल्यानंतर कृती समितीच्या वतीने राहुरी तहसील कार्यालयासमोर गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेले चक्री उपोषण आज मागे घेण्यात आले.
बंद पडलेला डॉ. तनपुरे कारखाना सुरू व्हावा. तसेच कारखान्यात व संलग्न शैक्षणिक संस्थांमध्ये झालेल्या गैरकारभाराची चौकशी व्हावी. कारखाना न चालवता आल्याने संचालक मंडळाने राजीनामे द्यावेत. यासाठी राहुरी तहसील कार्यालयासमोर ११ जानेवारी रोजी डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे साखर कारखाना बचाव कृती समितीने सुरू केलेल्या चक्री उपोषनस्थळी आज दिनांक १७ जानेवारी रोजी पारनेरचे आमदार निलेश लंके व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.
यावेळी आमदार लंके व जिल्हा बँकेचे संचालक अरुण तनपुरे यांनी उपोषणकर्ते अमृत धुमाळ, अरुण कडू, राजू शेटे, पंढरीनाथ पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी बोलताना आमदार लंके व जिल्हा बँक संचालक अरुण तनपुरे म्हणाले की, तनपुरे कारखाना प्रश्नी २० जानेवारी रोजी जिल्हा बँकेत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस कृती समितीचे निवडक सदस्य यांना बोलावून चर्चा करण्यात येणार आहे. त्या बैठकीत मार्ग न निघाल्यास पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल. आमदार लंके म्हणाले तुम्ही असे किती दिवस तहसिल समोर उपोषणाला बसले तरी गेंड्याची कातडे असणाऱ्यांना जाग येणार नाही. सभासदांच्या व कामगारांच्या हितासाठी कारखाना सुरु व्हावा. ही आमची पण प्रामाणिक भावना आहे. यासाठी आम्ही तुमच्या बरोबर नाहीतर तूमच्या पूढे दोन पाऊल असणार असे आमदार लंके म्हणाले.
आज आमदार निलेश लंके व सभापती अरुण तनपूरे यांनी आश्वासन दिल्यामुळे हे चक्री आंदोलन तात्पूरते स्थगीत करत आहोत. यातून काही मार्ग निघाला नाहीतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येईल. असे अमृत धुमाळ यांनी सांगीतले.