कोपरगाव : कोपरगाव शहरातील मालमत्ताधारकांना कोपरगाव नगरपरिषदेने पाठविलेल्या घरपट्टी आकारणी न करता हरकती न मागवता -सरसकट निर्णय घेऊन अवाजवी कर (घरपट्टी) कमी करा अशी मागणी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
कोपरगाव शहरातील मालमत्ताधारकांना कोपरगाव नगरपरिषदेने पाठविलेल्या घरपट्टी आकारणीच्या नोटिसा अतिशय अन्यायकारक व भरमसाठ असल्याचे प्रशासनाने मान्य केलेलेच आहे.भारतीय जनता पार्टी (वसंत स्मृती कार्यालय) शिष्टमंडळाशी प्रशासक-मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांची सविस्तर चर्चाही झालेली आहे.यानंतर सर्वांनीच जुन्या दराने आलेली घरपट्टीच भरावी असेही गोसावी यांनी जाहीरपणे सांगितलेलेच आहे. ज्यांना ज्यांना 40% पेक्षा जास्त अवाजवी कर आकारणीच्या नोटिसा आलेल्या आहेत त्यांनी घाबरून जाऊ नये.बहुतांश प्रकरणात वाढीव घरपट्टीच्या नोटिसा आलेल्या असल्याने, सर्वच प्रकरणांचा फेरविचार करून-कर आकारणी कमी करून पुन्हा नव्याने घरपट्टी आकारली जाणार असल्याचे प्रशासनाने मान्य केलेले आहे.
अशी वस्तुस्थिती असतांना प्रत्येकाने स्वतंत्रपणे हरकत नोंदविण्याची गरजच नाही.आपापले कामधंदे, व्यवसाय सोडून सर्वसामान्य नागरिकांना हरकती घ्यायला लावायचे काहीच कारण नाही.
अनेक मालमत्ताधारक अशिक्षित, रोजंदारीवर जाणारे,हातावर पोट भरणारे,जेष्ठ नागरिक,दिव्यांग नागरिक असल्याने त्यांना हरकतीच्या भानगडीत पडायला न लावता सर्वांच्याच हरकती आहेत असे समजावे व नव्या दराने कर आकारणी करावी.
मी नागरिकांना आवाहन करतो कि, जुन्या दराने आलेली घरपट्टीच भरा. हरकती नोंदविण्याचे काहीच कारण नाही.
कारण अवाजवी घरपट्टीच्या नोटिसा पाठवून केलेली चूक नगरपरिषदेने मान्यच केलेली आहे.पुढील वर्षासाठीही कुठल्याही परिस्थिती जास्तीतजास्त 40% टक्के पेक्षा
कमीच घरपट्टी आकारणी करावी लागणार आहे.एकाही प्रकरणात अवाजवी-अवास्तव घरपट्टी आकारली गेली तर प्रखर भूमिका घेऊन प्रशासनाला भानावर आणण्याचे काम केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
निवडणूक झाल्यानंतर येणारे नवीन नगराध्यक्ष -मुख्याधिकारी व सर्वपक्षीय नगरसेवक करआकारणीचा योग्य अंतिम निर्णय घेतील.सर्वच राजकिय पक्षांचा अवाजवी कर आकारणीला विरोध असल्याने घरपट्टी कमी होणारच आहे याबद्दल शंका बाळगण्याचे काहीच कारण नाही.