अर्धा तास ठेवलं अडवून ! टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार
बारामती : बारामती ज्यांच्या नावाने ओळखली जाते असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामतीतील टेक्साटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवल्याची माहिती समोर येते आहे.
शरद पवारांच्या पत्नी प्रतिभकाकी पवार आणि त्यांची नात रेवती सुळे यांना बारामती टेक्सटाइल पार्क मध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आले व आतमध्ये सोडले नाही. या टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आहेत.
व्हिडीओमध्ये काय आहे?
समोर आलेल्या व्हिडीओनुसार, शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाकाकी नात रेवती सुळेंसह शॉपिंग करण्यासाठी बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना पाहून गाडी अडवण्यात आली, असा दावा व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. आम्हाला वरुन आदेश आलेत, असे गेटवर तैनात असलेला सुरक्षारक्षक म्हणाला.
आम्ही चोरी नाही, शॉपिंग करायला आलो, प्रतिभाकाकींचा हल्लाबोल
प्रतिभा पवार या व्हिडीओमध्ये सुरक्षारक्षकाला सतत विचारत होत्या, तुम्हाला गेट बंद करण्यास कोणी सांगितले. आम्हाला पाहून तुम्ही गेट बंद केलं का? तुम्हाला कोणाचा फोन आला? आतमधील दुकाने सुरू आहेत मग मुख्य गेट बंद का केले? आम्ही चोरी करण्यासाठी थोडी आलो आहे. आम्ही बॅग घेण्यासाठी आलो आहेत. आम्हाला शॉपिंग करायची आहे. तुम्ही असे नाही वागू शकत. त्यावर सुरक्षा रक्षक म्हणाले, वरून परमिशन काढा.
गेट बंद करायला कोणी सांगितले? प्रतिभा पवारांचा सवाल
प्रतिभा पवार पुढे म्हणाल्या, ज्या सरांनी तुला फोन करून गेट बंद करण्यास सांगितले त्या सरांना विचार यांना शॉपिंग करायची सोडू का… मात्र सुरक्षारक्षक म्हणाला, मी तर सुरक्षारक्षक मला वरून जे सांगतात तेच आम्ही करतो. आम्ही फक्त सूचनांचे पालन करतो. मला फोन आला आणि मी मुख्य गेट बंद केले.