वर्धा : वर्ध्याचे वर्धा माजी खासदार रामदास तडस यांना देवळीतील राम मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आलं. जानवं आणि सोवळं घातलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला गाभाऱ्यात जाता येणार नाही, असं सांगत प्रवेश नाकारण्यात आल्याचं भाजपचे माजी खासदार रामदास तडस म्हणाले. पुजाऱ्यानं आतमध्ये जाण्यापासून रोखल्यानंतर रामदास तडस यांनी पत्नी आणि कार्यकर्त्यांसोबत बाहेरूनच रामाचं दर्शन घेतलं.
देवळीत रामदास तडस यांच्या घराच्या जवळ फार जुनं राम मंदिर आहे. याच राम मंदिरात रामनवमीनिमित्त रामदास तडस दर्शनासाठी गेले होते. यावेळी तडस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि भाजपचे काही कार्यकर्ते देखील होते. पण, या मंदिरात जाण्यापासून त्यांना रोखण्यात आलं. रामदास तडस म्हणतात, “मी 40 वर्षांपासून या मंदिरात राम लल्लांच्या दर्शनासाठी जातो. रामनवमीला नेहमी गाभाऱ्यात जाऊन राम लल्लांच्या मूर्तीची पूजा करून हार घालतो. त्यानंतर माझ्या कामांना सुरुवात करतो.” “पण, यावेळी मला विचित्र अनुभव आला. मला पुजाऱ्यानं हेकेखोरपणानं राम लल्लांच्या दर्शनासाठी गर्भगृहात जाऊ दिलं नाही. मुकुंद चौरीकर हेच पुजारी आणि ट्रस्टी दोन्ही आहेत. तो वर्षभर इथं राहत नाही. काही दिवसांसाठी येतो आणि आम्हाला अशी वागणूक देतो. मी तेव्हाच पुजाऱ्याला समज दिली.”
“सुरुवातीला त्यांनी इथं सोनं खूप आहे असं कारण दिलं. पण, आम्ही आणि इतर भाविक सोनं चोरायला येत नाही असं म्हटल्यानंतर त्यांनी दुसरं कारण दिलं.”
“आमच्या कार्यकर्त्याने विचारलं की, आम्हाला तुम्ही गाभाऱ्यात येऊ देत नाही, तर मग तुम्ही कसे तिथे आहात? तेव्हा पुजारी मुकुंद चौरीकर म्हणाला की, मी जानवं आणि सोवळं घातलं आहे, तुम्ही घातलं आहे का? तुम्हाला बाहेरूनच पुजा करायला लागेल.””यावेळी कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायचा प्रयत्न केला. पण, रामनवमीच्या दिवशी वाद वाढू नये म्हणून मी कार्यकर्त्यांना शांत केलं आणि बाहेरून दर्शन घेऊन निघून गेलो.” देवाच्या गाभाऱ्यात परवानगीशिवाय आता जाऊ नये, अशी पाटी गाभाऱ्याच्या बाहेर लावण्यात आलेली आहे.