भारतीय जनता पार्टीच्या दणक्याने मयत कंत्राटी कामगार विष्णू पाटील यांच्या परिवारास १० लाखाची आर्थिक मदत

0

उरण दि १६(वार्ताहर )दिनांक  ०९/१०/२०२२ रविवार रोजी उरण बोकडविरा येथील महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीच्या GTPS संयंत्रातील बॉयलर ऑपरेशन विभागात झालेल्या भीषण स्फोटात कनिष्ठ अभियंता- विवेक धुमाळे (वय-३४), तंत्रज्ञ-कुंदन कमलाकर पाटील (वय-४३) आणि कंत्राटी कामगार विष्णू यशवंत पाटील (वय-४३) हे गंभीररित्या जखमी झाले होते, त्यापैकी कुंदन कमलाकर पाटील आणि विष्णू यशवंत पाटील हे गंभीररित्या भाजल्यामुळे ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटर या इस्पितळात उपचार घेत होते तर कनिष्ठ अभियंता विवेक धुमाळे यांचे तात्काळ निधन झाले. सदर जखमी कामगारांना तात्काळ चांगले आणि योग्य उपचार मिळावे यासाठी बोकडवीरा गावच्या सरपंच मानसी देवेंद्र पाटील, माजी सरपंच भगवान पाटील, कॉमरेड जयवंत पाटील, रायगड जिल्हा परिषद सदस्य  विजय भोईर, व्यावसायिक सदानंद गायकवाड, डोंगरी गावचे दर्शन घरत, बोकडविरा गावचे अडवोकेट विजय पाटील,राजू पाटील, फुंडे गावचे सरपंच सागर घरत, भेंडखळ गावचे सरपंच लक्ष्‍मण ठाकूर आणि अन्य ग्रामस्थ यांनी कंपनी व्यवस्थापनावर दबाव आणून तात्काळ उपाय योजना करण्यास दबाव आणला. इस्पितळात गेल्यावर सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार आणि जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी प्रशासनास विचारणा केली असता कामगारांची संपूर्ण उपचाराची जबाबदारी घ्यायचे प्रशासनाने मान्य केले. परंतु दुर्दैवाने कंत्राटी कामगार विष्णू यशवंत पाटील रा- बोकडवीरा आणि तंत्रज्ञ- कुंदन कमलाकर पाटील रा-डोंगरी यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. जे कामगार कंपनीच्या पे-रोलवर होते, त्यांचीदेखील जबाबदारी घेण्यास प्रशासनाने नकार दिला. ज्यांनी कर्त्तव्य बजावताना आपले प्राण गमावले त्यांना सुद्धा प्रशासनाने वाऱ्यावर सोडले.  तर कंत्राटी कामगार विष्णू यशवंत पाटील यांच्या उपचारावरील खर्च देण्यास कंपनीने नकार दिला. त्यावेळी सदर कामगाराचे पार्थिव हे तब्बल ३ तास इस्पितळात पडून होते. सदर घटनेची माहिती स्थानिक संबधित कंत्राटदाराने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सदर कामगाराचे उपचाराचे बिल रु. १ लाख ५ हजार स्व-खर्चाने भरून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यावेळी स्वत:ला कामगार नेते समजणारे तथाकथित कामगार नेते आणि कार्यसम्राट कंपन्यांचे दलाल काय करत होते, असा प्रश्न सामान्य नागरीकांना पडला होता. मृत कामगाराचे नातेवाईक, ग्रामस्थ, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते यांनी सदर मृत कामगाराचे पार्थिव कंपनीला जाब विचारण्यासाठी ज्यावेळी कंपनीच्या प्रवेश द्वाराजवळ ठेवले, तेव्हा जमलेल्या सर्व राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कंपनी प्रशासन विरुद्ध प्रचंड संताप व्यक्त केला.

मात्र प्रशासनाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. प्रशासनाची दलाली करणारे तथाकथित कामगार नेते आणि कार्यसम्राट कंपनीचे दलाल मात्र प्रशासनाची बाजू सावरतांना दिसले याचा तीव्र राग स्थानिक आणि कामगारात आहे. या गोष्टीची प्रचंड चीड येऊन भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला जाब विचारत कायदेशीर कारवाई करून प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असा पोलीस यंत्रणेकडे आग्रह धरला. यासाठी योग्य ते मार्गदर्शन एडवोकेट विजय पाटील यांच्या कडून घेणार असल्याचे ठरले. त्यावेळी ताळ्यावर येत उपस्थित अधिकारी, मुख्य अभियंता सुनील इंगळे, अभियंता – गरुड व त्यांचे मानव संसाधानाचे वरिष्ठ अधिकारी यांनी तातडीची सर्व कंत्राटदाराची सभा घेऊन मयत कामगारासाठी आर्थिक मदत करावी आणि त्या मोबदल्यात आम्ही तुमच्यावर कृपा दृष्टी ठेऊ असे सांगितले. या सहकार्यातून जमलेली रक्कम ही संबधित कंत्राटदारामार्फत मृत कामगाराच्या परिवारास देण्याचे सुचविले. संबधित कंत्राटदाराने सदर अपघातास आम्ही जबाबदार नसून संपूर्ण जबाबदारी ही संबधित अधिकाऱ्यांची आहे असे ठणकावले आणि सदर प्रस्तावाला सपशेल नकार देत जी मदत आहे ती महाजेनको च्या माध्यमातूनच व्हावी आणि मृत कामगारांच्या परिवारास पुनर्वसनासाठी त्यांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरी मिळाली पाहिजे असा आग्रह धरला.  तसेच, कोणत्याही अनैतिक मार्गाने भ्रष्टाचार करून कंत्राटदारांमार्फत पैशांची जमवाजमव केल्यास प्रशासन आणि कंत्राटदाराची अभद्र युती होऊन याचा परिणाम कामाच्या दर्ज्यावर होईल आणि भविष्यात पुन्हा अपघाताची पुनरावृत्ती होण्याचा धोका निर्माण होईल.

सदर महाजेनको- वीज निर्मिती प्रकल्प अत्यंत उच्चदाबाच्या वाफेवर उर्जा निर्मिती करतो त्यासाठी अत्यंत धोकादायक बॉयलरची किचकट संयंत्रणा वापरण्यात येते. परंतु या धोकादायक प्रक्रियेवर वेळोवेळी काटेकोरपणे परीक्षण करणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी अशा धोकादायक प्रकल्पामध्ये पूर्णवेळ कार्यकुशल सुरक्षा अधिकारी (सेफ्टी ऑफिसर) असणे कायद्याने बंदनकारक आहे. मात्र, इतके महत्वपूर्ण पद रिक्त ठेऊन याची जबाबदारी एका असंबंधित अभियंत्याकडे देण्यात आली होती. याचा परिणाम संयंत्रात गडबड झाल्यावर जी स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित व्हायला हवी होती, ती यंत्रणा कार्यन्वित न झाल्यामुळे संयन्त्रातील दाब अधिक वाढल्यामुळे परिणामे हा भीषण स्फोट झाला असा कंपनी कामगारांचा आरोप आहे.  अशा दुर्घटना वारंवार झाल्याचेही कामगारांनी सांगितले. तसेच, यामध्ये कंपनी प्रशासनाचा गलथानपणा आणि सुरक्षा नियमांना धाब्यावर बसवल्यामुळे हा अपघात झाला अशी कंपनी कामगारांमध्ये तीव्र भावना आहे. सदर गलथानपणासाठी कंपनीला धारेवर धरण्याऐवजी कामगार संघटना मात्र मूग गिळून गप्प बसलेल्या आहेत. त्यामुळे सदर कामगाराच्या परिवाराचे पुनर्वसन कसं होणार हा प्रश्न इतर कामगारांमध्ये आणि मयत कामगाराच्या कुटुंबियांना भेडसावत आहे. 

सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य त्या उपाययोजना व्हाव्यात, सदर अपघातासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अपघातात मृत कामगारांच्या परिवाराचे पुनर्वसन व्हावे ई. मागण्यांसाठी उरणचे कार्यकुशल आमदार महेशजी बालदी यांच्याशी बोकडवीरा गावच्या भा.ज.प.च्या सरपंच मानसी पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य  विजय भोईर, सुनील पाटील, शेखर पाटील, यांनी त्वरित संपर्क साधून यात जातीने लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आणि आमदारांनी याचा वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा करून दोषींवर कारवाई करून भविष्यात अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, मृत कामगाराच्या वारसदारांना लवकरच कायमस्वरूपी नोकरी व संबधित विभागाकडून आर्थिक मदत मिळवून देऊ असा विश्वास व्यक्त केला. तसेच, राजकीय अकसापोटी स्थानिक कंत्राटदाराची गळचेपी करण्याचा प्रयत्न कंपनी प्रशासनाला हाताशी धरून तथाकथित कामगार नेते आणि विरोधी राजकीय कार्यसम्राट दलाल करत असल्याचे निदर्शनास आणून दिले. वरील सर्व बाबींचा विचार करता भविष्यात तरी कंत्राटी कामगारांसाठी कंपनी प्रशासन योग्य अशी अपघात सहाय्य पॉलिसी बनवावी आणि कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवावेत. यासाठी संबधित कायद्याची आणि सुरक्षेची प्रक्रिया राबवावी यासाठी येत्या हिवाळी अधिवेषनात हा मुद्दा आग्रहाने मांडण्याचे आमदार महेश बालदी यांनी आश्वासन दिले आहे. तसेच, उर्जा मंत्रालयाचे मुख्य सचिवांशी सविस्तर चर्चा झालेली असून ह्या अपघातास जबाबदार असणाऱ्या सर्व संबधित अधिकाऱ्यांवर उच्च स्तरीय विभागीय चौकशी समिती नेमण्याची कार्यवाही सुरु केलेली आहे. भाजपाच्या या प्रयत्नामुळे सदर अपघाताची कायदेशीर चौकशी होऊन संबधित दोषींना शिक्षा होईल आणि भविष्यात असे अपघात होणार नाहीत असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here