येवला प्रतिनिधी : शाळा-महाविद्यालयात दैनंदिन परिपाठात भारतीय संविधानाच्या रोज एक कलमाचे वाचन (स्पष्टीकरण/सविस्तर माहिती सांगणे) अनिवार्य करावे अशी मागणी राष्ट्रीय बालक-विद्यार्थी, पालक,शिक्षक,शिक्षण-प्रशिक्षण संस्था अध्यापकभारती चे संस्थापक शरद शेजवळ यांनी महाराष्ट्र शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. खंडप्राय भारत देशाची लिखित व जगातील सर्वात मोठी लोकशाहीवादी राज्य घटना (संविधान) हे भारतीय लोकजीवनाचे भूषण असून ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन/संविधान दिन येत्या दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी देशभर साजरा होत आहे.
विविध प्रकारच्या भाषा,वेशभूषा,प्रथा,परंपरा, धर्म-पंथ,रिती-रिवाज,संस्कृतीनी नटलेला भारत देश केवळ मात्र संविधानामुळे अखंड व अभेदय आहे. भारतीय संविधानिक नीती-मूल्य,हक्क,कर्तव्यांची जाणीव अधिक ठळकपणे शाळा-महाविद्यालयापासून रुजवावी,संस्कारित होणे नितांत आवश्यक आहे.म्हणून शाळा महाविद्यालय स्तरापासून विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची तोंडओळख, प्राथमिक माहिती,उद्देशिकेचा अर्थ,लोकशाही, समता,स्वातंत्र्य, न्याय,बंधुता,समाजवादी,धर्मनिरपेक्षता,वैज्ञानिक दृष्टिकोन,राष्ट्रीय एकता-एकात्मता हि मूल्य-राष्ट्रीय सूत्र संस्कारित तथा विकसित करण्यासाठी येत्या २६ जानेवारी २०२५ पासून शाळा-महाविद्यालयात दैनंदिन परिपाठात भारतीय संविधानाच्या रोज एक कलमाचे वाचन अनिवार्य करावे अशी मागणी अध्यापकभारती(राष्ट्रीय बालक-विद्यार्थी, पालक,शिक्षक,शिक्षण-प्रशिक्षण संस्था) च्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे अध्यापकभारती चे संस्थापक शरद शेजवळ यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
निवेदनावर शरद शेजवळ,शैलेंद्र वाघ,प्रा.प्रभाकर मासुळ,विनोद पानसरे,अमीन शेख,वनिता सरोदे,प्रा.कामिनी केवट,विनोद सोनवणे, बाबासाहेब गोविंद,विश्वास जाधव, प्रशिल शेजवळ,नुमान शेख,संतोष पाटील-बुरंगे,सुभाष वाघेरे,अभय लोखंडे,अक्षय गांगुर्डे, अखिल गांगुर्डे,दीपक शिंदे,सचिन शिराळ,भारती बागुल,राजरत्न वाहुळ आदींच्या सह्या आहेत.