भारत जोडोचे समन्वयक आ. बाळासाहेब थोरात यांच्या नियोजनाचे देशात कौतुक ; संगमनेर मधून हजारो कार्यकर्ते सहभागी 

0

संगमनेर / चंद्रकांत शिंदे पाटील

एकात्मता व प्रेमाचा संदेश घेऊन कन्याकुमारी ते काश्मीर निघालेली काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा या यात्रेचे महाराष्ट्र समन्वयक आ. बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचे देशपातळीवर कौतुक होत आहे. दरम्यान भारत जोडो यात्रेत संगमनेर तालुक्यातून हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
          देशात सध्या जाती-धर्माच्या नावावर राजकारण सुरू असून वाढलेली महागाई, बेरोजगारी याविरुद्ध आवाज उठवत सर्वांना समवेत घेत संविधान वाचवण्यासाठी असलेली आणि एकतेचा संदेश देणारी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा ही महात्मा गांधींच्या दांडीयात्रेप्रमाणे ऐतिहासिक ठरणार आहे.या यात्रेचे ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात आगमन झाले असून नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांमधून ३८२ किलोमीटरचा प्रवास करून ही भारत जोडो यात्रा जात आहे. या यात्रेच्या संयोजनाची व नियोजनाची जबाबदारी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते,माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर असून आमदार थोरात यांनी प्रत्येक ठिकाणचे केलेले नियोजन, सर्व भारत यात्रींची व्यवस्था, स्थानिक व त्या भागातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेत प्रशासनाने केलेली तयारी. या तयारीचा दररोज घेतला जाणारा आढावा आणि महाराष्ट्राची व देशाची सांस्कृतिक परंपरा दाखवणाऱ्या विविध वेशभूषा करून सहभागी झालेले तरुण, कष्टकरी ,नागरिक, महिला यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. त्याचप्रमाणे पुरोगामी विचारांच्या विविध संघटना, सुमारे अडीचशे साहित्यीक , कवी, लेखक, विचारवंत यांनी दिलेला पाठिंबा, चित्रपट क्षेत्रातील विविध मान्यवर यांचा सहभाग अशा सर्वांच्या सहभागातून महाराष्ट्रात या यात्रेला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आमदार बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्रातील लोकप्रिय नेतृत्व असून त्यांनी भारत जोडो यात्रेच्या समन्वयाची जबाबदारी अत्यंत उत्कृष्टरित्या सांभाळली आहे. राज्यभरासह अहमदनगर जिल्ह्यातील व संगमनेर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते दररोजचे नियोजन करत आहेत. यामध्ये प्रदेश व काँग्रेसचेे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे, डॉ जयश्री थोरात यांच्यासह विविध कार्यकर्त्यांचाही सहभाग आहे. उद्या शुक्रवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी  शेगाव येथे खासदार राहुल गांधी यांची भव्य सभा होणार आहे.या सभेची काँग्रेसकडून जय्यत तयारी करण्यात आली असून एकोणावीस एकरावर सुमारे अडीच लाख क्षमता असलेले मैदान तयार करण्यात आले   असून ११ प्रवेशद्वार बनवण्यात आले आहेत. याचबरोबर वरखेड येथे विठ्ठलाची महाकाय मूर्ती समोर रिंगण सोहळा पार पडणार आहे.वारकऱ्यांसमवेत खासदार राहुल गांधी या रिंगण सोहळ्यात सहभागी होणार असून यानंतर ते शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन सभेला संबोधित करणार आहेत.या सभेमध्ये ४० बाय १०० चे तीन व्यासपीठ राहणार असून सभेची एकूण जागा १४ हजार फूट इतकी विस्तीर्ण आहे. या मैदानावर अडीच लाख खुर्च्या लावण्यात आल्या असून महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्ते या सभेला येणार आहेत.शेगाव येथे होणाऱ्या सभेची आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जय्यत तयारी सुरू असून यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही सभा ऐतिहासिक ठरणार आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण भारत जोडो   यात्रा व शेगावच्या सभेचे नियोजन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली होत असून आमदार थोरात यांनी केलेले काटेकोर नियोजन हे देशभरात कौतुकास्पद ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here