संगमनेर / चंद्रकांत शिंदे पाटील
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सात सप्टेंबर पासून निघालेली भारत जोडो यात्रेचे ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात आगमन होणार असून या यात्रेत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सहभागी व्हावे यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत काल सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना निमंत्रण दिले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची वाय बी सेंटर येथे तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना खासदार राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. या शिष्टमंडळात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते तथा राज्याचे माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री आ.अशोकराव चव्हाण, माजी मंत्री आ.डॉ. विश्वजीत कदम, विधान परिषदेतील गटनेते आ.अमर राजूरकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी.एम. संदीप, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ.भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, आ.डॉ सुधीर तांबे, प्रदेश सरचिटणीस रामचंद्र दळवी हे उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे. दरम्यान खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबर पासून सुरू झाली असून केरळ,तामिळनाडू असा प्रवास करत आता ती कर्नाटक मध्ये आहे. सप्टेंबर मध्ये सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेचे तब्बल दोन महिन्यांनी म्हणजे ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात आगमन होणार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे.